Chandrapur Farmer Sold Kidney : एका शेतकऱ्याला सावकाराने कर्ज फेडण्यासाठी किडनी विकायला लावली. शेतकऱ्याने घेतलेलं एका लाखाचं कर्ज 74 लाखांवर पोहोचलं. इतकी मोठी रक्कम फेडण्यासाठी सावकाराने किडनी विकण्याचा सल्ला दिला.
सावकारीला बळीराजा हरला
चंद्रपूर जिल्हातील या कर्जबाजारी शेतकऱ्याची वेदना आभाळाला भिडणारी आहे. सावकारी कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या या शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी विकण्याचा वेदनादायी प्रसंग ओढवला आहे. या शेतकऱ्याचं नाव आहे रोशन सदाशिव कुडे. ते चंद्रपूर जिल्हातील मिंथुर गावातील रहिवाशी आहेत. निसर्गाला जिंकणारा बळीराजा सावकारीला मात्र पुरता हरला आहे.
Beed News : उलटीचा त्रास झाल्याने 13 वर्षीय संस्कृतीला रुग्णालयात नेलं, पण तिथं विपरीत घडलं; कुटुंबाने डॉक्टरांवर केले गंभीर आरोप
एक लाखाचं कर्ज 74 लाखांवर गेलं
रोशन कुडे यांच्याकडे चार एकर शेती आहे. या शेतीवरच त्यांचा कुटुंबाच्या उदरनिर्वाह चालतो. निसर्गाचा लहरीपणामुळे शेती फायदेशीर ठरली नाही. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय करण्याचं त्यांनी ठरवलं. दुग्ध व्यवसायातून थोडी मिळकत होईल म्हणून त्यांनी गाई खरेदी केल्या. यासाठी त्यांनी दोन सावकाराकडून 50-50 हजार रुपये घेतले. येथेही त्यांना नशिबाने धोका दिला. खरेदी केलेल्या गाई मरण पावल्यात. त्यात शेतीही पिकेना. कर्जाचा डोंगर वाढत गेला.
सावकार घरी येऊन नको ते बोलू लागले. कर्जातून मुक्त होण्यासाठी त्यांनी दोन एकर जागा विकली. ट्रॅक्टर आणि घरातील सामान विकलं. मात्र कर्ज काही संपेना. एक लाखाचे कर्ज 74 लाखावर गेलं. सावकाराकडून भरमसाठ व्याजासह वसुली केली जात आहे. एका लाखावर दिवसाला 10 हजार प्रमाणे व्याज घेतलं जात असल्याने शेतकऱ्याने एक लाख घेतलेलं कर्ज तब्बल 74 लाखांवर गेलं.
शेवटी कर्ज घेतलेल्या एका सावकाराने किडनी विकण्याचा सल्ला दिला. एका एजंटने रोशन कुडे यांना कोलकत्ता येथे नेलं. कुडे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर कंबोडिया येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि किडनी काढण्यात आली. ही किडनी कुडे यांनी आठ लाखाला विकली.
फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावाने शेतकरी चिंतेत, चंद्रपुरात बरसला रिपरीप पाऊस; कापूस, तूर पिक संकटात
सावकारापुढे पोलीस विभाग हतबल –
अन्याय झाला की सामान्य माणूस पोलीस स्टेशन गाठतो. येथे न्याय मिळेल ही अपेक्षा असते. मात्र कुडे यांच्याबाबत तसं घडलं नाही. कुडे यांनी सांगितलं, पोलीस अधिक्षकांकडे मी तक्रार दिली. मात्र त्यांच्याकडून कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. पोलिसांनी वेळीच लक्ष दिलं असतं, तर कुडे यांच्यावर दुदैवी प्रसंग ओढवला नसता.
…तर मंत्रालयापुढे कुटुंबासह आत्मदहन
एक लाख कर्ज घेतलं होतं. त्याचे 74 लाख झाले. शेतकऱ्याचं अजूनही कर्ज पूर्णपणे फिटलेलं नाही. पैशासाठी तगादा सुरूच आहे. कर्जासाठी किडनी गेली. आता हाती काहीच उरलं नाही. आता मंत्रालयात पुढे संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करू, असं शेतकरी कुडे यांनी म्हटलं आहे.
