उधारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून भरतवाडा परिसरात २२ वर्षीय महेश डहारेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाली. मृत महेश हा आपल्या कुटुंबाचा आधार होता आणि मजुरी करून घर चालवत होता…
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ३ डिसेंबरच्या रात्रीपासून ४ डिसेंबरच्या पहाटेच्या दरम्यान घडली. मृत तरुणाचे नाव महेश लतेलुराम डहारे (वय २२) असे आहे. महेश हा आपल्या कुटुंबाचा आधार होता आणि तो एका आरामशीनमध्ये मजुरीचे काम करून घर चालवत होता. मृतकाचा भाऊ धर्मेंद्र डहारे याने कळमना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, महेश ज्या आरामशीनमध्ये काम करत होता, त्याच ठिकाणी चंद्रेश उर्फ रानू वर्मा आणि रितीक नंदेश्वर हे दोघेही कामाला होते. यांच्यात काही दिवसांपासून उधारीच्या पैशांवरून वाद सुरू होता. ३ डिसेंबरच्या रात्री हा वाद अधिक तीव्र झाला. त्यानंतर दोन आरोपींनी संगनमत करून महेशवर हल्ला घडवून आणल्याचा आरोप आहे.
Nagpur Crime: उधारीच्या किरकोळ वादातून दोघांनी तरुणाचा जीव घेतला, महेशला दगडाने ठेचून…; नागपुरात काय घडलं?
आरोपींनी महेशच्या डोक्यावर मोठ्या दगडाने वार केले. वार इतके भीषण होते की महेश गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. परिसरातील नागरिकांनी तातडीने महेशला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच कलमना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि आरोपींविरुद्ध हत्या (कलम ३०२) अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी चंद्रेश उर्फ रानू वर्मा याला अटक केली आहे. त्याच्याकडून चौकशी सुरू असून हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेला दगडही पोलिसांनी जप्त केला आहे. दुसरा आरोपी रितीक नंदेश्वर हा गुन्हा घडताच फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत.
या घटनेमुळे डहारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. उधारीच्या पैशांवरून होणाऱ्या वादातून इतका गंभीर गुन्हा घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. पोलिसांनी लवकरच फरार आरोपीला अटक करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
