Maharashtra Nagar Parishad Election Result: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल लांबणीवर पडला आहे. निवडणूक आयोगाने काही ठिकाणी निवडणुका 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्यामुळे आता निकालही लांबणीवर पडला असून याबाबतचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहेत.
राज्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार असून याबाबत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठने आदेश दिले आहेत. पूर्वीच्या कार्यक्रमानुसार आज होणाऱ्या मतदानाची मतमोजणी उद्या 3 डिसेंबरला होणार होती. त्याविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती. यावर झालेल्या सुनावणीत दोन्ही टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर 21 डिसेंबरला एकत्रित मोजणी करण्याचा आदेश कोर्टाकडून देण्यात आला.
दरम्यान, निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर रोजी एक परिपत्रक काढले. या परिपत्रकानुसार, ज्या ठिकाणी जिल्हा कोर्टात अपील सुरू आहे किंवा जिथे अपिलांचा निकाल लागण्यास उशीर झाला आणि उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी फक्त तीन दिवसांचाच अवधी मिळाला, अशा सर्व ठिकाणी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
किती निवडणुका लांबणीवर?
यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादात सापडत आहेत. सुरुवातीला मतदारयाद्यांवरून विरोधी पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाला लक्ष्य केले होते. राजकीय पक्षांनी दुबार मतदारांचा विषयही प्रतिष्ठेचा केला होता. न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे 4 नगर पंचायती आणि 20 नगर परिषदांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. तसेच 76 नगर पंचायती आणि नगर परिषदांमधील एकूण 154 सदस्यांच्या निवडणुकांही सुधारित कार्यक्रमानुसार 20 डिसेंबरला घेण्यात येणार आहेत. निवडणुका स्थगित करण्याचा आदेश आयोगाने मतदानाच्या जेमतेम 72 तास आधी जारी केल्याने राजकीय नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
