• Fri. Mar 6th, 2026

    Pune Weather: पुण्यात हुडहुडी… थंडीचा कडाका वाढला, पारा घसरला, तापमान 9.8 अंश सेल्सिअसवर

    Pune Weather: पुण्यात हुडहुडी… थंडीचा कडाका वाढला, पारा घसरला, तापमान 9.8 अंश सेल्सिअसवर

    Pune Weather Update: पुण्यात पारा मोठ्या प्रमाणात घसरला असून कडाक्याची थंडी पडत आहे. सकाळपासूनच गारठा जाणवत असून संध्याकाळी तो आणखी वाढल्याचं पाहायला मिळालं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: आठवडाभरात वाढलेल्या तापमानात सलग दुसऱ्या दिवशी घट होऊन पुण्यात दिवसभरात कमाल 27.9 आणि किमान 9.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. शहरात शनिवारी रात्रीपासूनच वाढत गेलेला गारवा पहाटेपर्यंत कायम राहिल्याने पुणेकरांची रविवारची सकाळी निवांत झाली. सुट्टी असल्याने आल्हाददायक गारठ्यामध्ये वाफाळणारा चहा घेऊन पुणेकर थंडीची मजा घेत असताना दिसून आले. महिनाभरात दुसऱ्यांदा तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली घसरला आहे.

    उत्तरेकडून महाराष्ट्राच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांना अनुकूल वातावरण असल्याने पुण्यासह मध्य महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसात हवेतील गारवा वाढल्याचं पाहायला मिळत आहे. रविवारी (30 नोव्हेंबर) किमान तापमानात पाच अंशाने घट नोंदविण्यात आली आहे. पहाटे कडाक्याची थंडी होती, शिवाय सकाळी 9 वाजेपर्यंत रस्त्यावर फिरताना हवेत गारवा जाणवत होता. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत दुपारी उन्हाची तीव्रताही कमी होती आणि संध्याकाळनंतर गार वारा सुटल्याने बोचऱ्या थंडीचा अनुभव पुणेकरांनी घेतला. सुट्टी असल्याने संध्याकाळनंतर खरेदीसाठी बाहेर पडलेले पुणेकर स्वेटर, मफलर घालून फिरताना दिसून आले. उपनगरांमध्येही मध्यवर्ती पुण्यापेक्षा जास्त गारठा जाणवत होता.

    मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पारा घसरला

    दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही तापमानात लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे. पुणेकरांचे लाडके हिल स्टेशन असलेल्या महाबळेश्वरमध्ये कमाल 25.1 आणि किमान 11.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील उच्चांकी 34 अंश सेल्सिअस रत्नागिरी तर नीचांकी तापमान 9 अंश सेल्सिअस जळगावमध्ये नोंदविण्यात आले. पुढील दोन दिवस आकाश निरभ्र असेल, तसेच तापमानातील घट कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुणेकरांना कडाक्याच्या थंडीची मजा अनुभवता येणार आहे.

    शहराच्या वेगवेगळ्या भागातील तापमान काय?

    नोंदवलेले तापमान (अंश सेल्सिअस)

    • गिरीवन – 15.3
    • आंबेगाव – 10.7
    • तळेगाव – 10.1
    • शिवाजीनगर – 9.8
    • बारामती – 9.6
    • पाषाण – 9.4
    • हवेली – 7.8
    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा