• Wed. Mar 11th, 2026
    Eknath Shinde: ‘सीएम’ला सोन्याची शिंगे येतात का? एकनाथ शिंदेंचा फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा

    Eknath Shinde Speech: शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगूर येथे सभा झाली. या सभेत बोलताना शिंदे यांनी शिवसेनेविरोधात येथे एकत्र आलेल्या राष्ट्रवादी, भाजप, उबाठा आणि राशपच्या युतीवर टिकास्र सोडले.

    shinde(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: मी मुख्यमंत्री असताना लोक मला चिफ मिनिस्टर म्हणायचे. परंतु, सीएम म्हणजे कॉमनमॅन, असे मी म्हणायचो. ‘चिफ मिनिस्टर’ म्हटले आणि ‘कॉमन मॅन’ म्हटल्याने काय होते. ‘चीफ मिनिस्टर’ म्हटले म्हणजे काय सोन्याची शिंगे येतात आणि ‘कॉमन मॅन’ म्हटले म्हणून निघून जातात का, असा सवाल उपस्थित करीत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. ‘शिवसेना को हराना मुश्किल ही नहीं, नामुमकिन हैं’ असा फिल्मी संवाद साधून त्यांनी भाजपलाही सुनावले.

    मला जनतेनेच ‘डीसीएम’ म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन ही पदवी दिली आहे. सर्वसामान्य माणूस केंद्र बिंदू आहे. राज्य सर्वसामान्य माणसांचे आहे, असे सांगतानाच, एकनाथ शिंदेने दिलेला शब्द काळ्या दगडावरची भगवी रेष आहे, असे ते म्हणाले. नगरपालिकांच्या विकासाठी आवश्यक नगरविकास, पाणीपुरवठा, उद्योग हे विभाग शिवसेनेकडे आहेत. नगरपालिकांसाठी लागणारा निधी हा नगरविकास खात्यांमार्फतच मिळतो. त्यामुळे हा विभाग शिंदेंकडेच असून, भगूरच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. तुम्ही जे जे सांगाल, ते मी करणार, परंतु, २ डिसेंबरला शिवसेनेला विजयी करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
    Maharashtra TimesNashik News : सुपारीसोबतच प्रचाराचा नारळही फुटला! महायुतीकडून तिकीट, मतदानाच्या दिवशीच लग्नाचा मुहूर्त, नवरदेव ‘उमेदवार’ म्हणतो…
    सत्ताधाऱ्यांकडून शहर भकास
    घोटी :
    इगतपुरी शहराच्या दृष्टीने शहराच्या भवितव्याचा व भविष्याचा फैसला करण्याचा दृष्टीने ही निवडणूक आहे. यापूर्वीच्या सत्ताधिकाऱ्यांनी शहराचा विकास करण्याऐवजी भकास केले. त्यामुळे आता या शहराच्या विकासासाठी परिवर्तन घडवून महायुतीच्या हाती सत्ता द्या, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

    इगतपुरी येथे शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारसभा घेतली. इगतपुरी शहर प्रमुख शहर असल्याने या शहरात विकासाला वाव आहे. मात्र, इच्छाशक्तीची गरज आहे. त्यामुळे नगरविकास खाते, अर्थ खाते, अल्पसंख्याक विभाग, पर्यटन विभाग,उद्योग विभाग या सर्वांच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास घडवू.
    Maharashtra TimesMaharashtra Politics : ठाकरेसेनेच्या उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
    इगतपुरी शहरात अनेक वर्षे सत्तेत राहूनही विरोधकांनी काय विकास केला? मुंबईत राहून इगतपुरीचा विकास कसा होणार, शहरात काय दिवे लावलेत, असा शाब्दिक हल्ला त्यांनी विरोधकांवर केला. भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त व गुंडगिरीमुक्त शहर करण्यासाठी साथ द्या, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संजय खातळे, फिरोजभाई पठाण, गोरख बोडके, ज्ञानेश्वर लहाने, रघुनाथ तोकडे, माजी सभापती संपतराव काळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे, पांडुरंग शिंदे आदी उपस्थित होते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा