Dhule Youth Fell In River: नदीच्या पुलावर सेल्फी घेत असताना तरुणाचा तोल गेला आणि तो थेच नदी पात्रात पडला. तरुण बुडत असल्याचं पाहून स्थानिकांनी तात्काळ मदतीला सुरुवात केली.
हा संपूर्ण थरार धुळ्यातील मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे येथील तापी पुलावर घडल्याची माहिती आहे. सावळदे तापी पुलावर साई पाटील हा युवक दुपारच्या सुमारास मोबाईलने सेल्फी फोटो काढत होता. तेवढ्यात साई पाटीलचा तोल गेला आणि तो पुलावरुन थेट तापी नदीपात्रात कोसळला. नदीत पडताच तो बुडू लागला.
तापी नदीत तरुणाला बुडत होता. त्याने पाण्यात हात पाय मारत आपला जीव वाचवण्याचा अतोनात प्रयत्न केला. या दरम्यान, या पुलावरुन जाणाऱ्या काही प्रवाशांनी तापी नदीत युवक बुडत असल्याचं पाहून आरडाओरड केली. त्यांनी तात्काळ साई पाटील याला वाचविण्यासाठी मदतकार्य सुरू केले. या साऱ्या घटनेमुला पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती.
साई पाटीलला वाचविण्यासाठी कोणी काय, तर कोणी काय प्रयत्न करत होते. यावेळी एका वाहनातील दोरखंड घेत तो दोरखंड तापी नदी पात्रात फेकण्यात आला, तर सावळदे येथील पट्टीचे पोहणारे बोलवून तापी नदीपात्रात साईला वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. यावेळी साई पाटीलने दोरखंड कंबरेला बांधून दोरखंड पकडला आणि उपस्थितांनी साईला वेळीच तापी नदीपात्राबाहेर काढत तात्काळ शिरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. उपस्थितांनी मदतकार्यासाठी थोडाही उशीर केला असता तर साई पाटील हा पाण्यात बुडून अनर्थ घडला असता. काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशीच काहीशी घटना तापी पुलावर घडली आहे.
