सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत आहेत. राज्यात महायुतीचं सरकार असताना सिंधुदुर्गात अशा घडामोडी का घडत आहेत? या मागील कारण शिवसेना आमदार निलेश राणे यांनी दिलं आहे. निलेश राणे यांनी भाजपच्या एका बड्या नेत्याकडे बोट दाखवलं आहे. पण त्यांनी त्या नेत्याचं नाव घेतलेलं नाही.
माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे उर्फ एनटीआर शिवसेनेत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचा एक छत्री अंमल होता. काँग्रेसमध्ये गेल्यावर काँग्रेसकडे सत्ता होती. स्वाभिमान पक्ष स्थापन झाल्यावर स्वाभिमानकडे एक हाती सत्ता होती. आणि आता राणे भाजपामध्ये असताना त्यांचे वर्चस्व सिंधुदुर्ग जिल्ह्यावर असल्याचे स्पष्ट आहे. मात्र हेच वर्चस्व एका बड्या नेत्याला खुपत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी महायुती व्हावी म्हणून स्पष्ट भूमिका घेतली होती. यासाठी नारायण राणे यांच्या समवेत शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत, माजी मंत्री दीपक केसरकर, मंत्री नितेश राणे, निलेश राणे यांची एकत्रित बैठकही झाली. महायुती व्हावी यासाठी प्राथमिक चर्चाही झाली. मात्र, जिल्ह्यात ही महायुती होऊ शकली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील तीनही नगरपरिषद आणि नगरपंचायत शिवसेना-भाजपा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी त्यांच्या कणकवली दौऱ्यात माध्यमांचा बोलताना भूमिका स्पष्ट केली आहे. इतकेच नाही तर नाव न घेता त्यांनी एका भाजपाच्या बड्या नेत्यावर निशाणा साधला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नागपूरमध्ये भूकंप, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांचा राजीनामा
निलेश राणे काय म्हणाले?
“महायुती तोडायचा जो निर्णय झाला आहे तो जिल्ह्यातून झालेला नाही. नितेश राणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. हा महायुतीत तोडायचा जो निर्णय झाला आहे तो बाहेरून झालेला आहे. आणि मी यापूर्वी अनेक पत्रकार परिषदेमधून स्पष्ट केलं आहे. हे नातं असं कुठल्या निवडणुकीत निवडणुकांमुळे तुटत नसतं आणि ते तुटणारही नाही. महायुतीबाबत जे डिसिजन घेतले गेले ते भारतीय जनता पक्षाच्या वरच्या स्तरावरून घेतले गेले जे आम्हाला दिसत आहे. म्हणून आम्हाला जे करायचं होतं त्यासाठी आम्ही खूप वेळ थांबलो. पण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांचा डिसिजन होत नव्हता म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागला”, अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली आहे.
पुण्यात महायुतीतल्या कुरघोडीच्या राजकारणाने टोक गाठलं, मंत्री उदय सामंत आक्रमक, म्हणाले…
“आम्ही खूप दिवस थांबलो. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर येत नव्हतं. किती बैठका करायचे त्यालाही काही मर्यादा असतात. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. आमदार-खासदारांच्या नाहीत म्हणून आम्ही राणे साहेबांना भेटून त्यांना सांगून हा निर्णय घेतला आहे. ज्या ठिकाणी चांगले उमेदवार आहेत त्या ठिकाणी शिवसेना पाठिंबा देणार. हा आम्ही निर्णय घेतला आहे”, असेही निलेश राणे यांनी स्पष्ट केलं.

