Dharashiv Crime: धाराशिवमध्ये भर रस्त्यात कोयता घेऊन दहशत पसरवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. बार्शी नाका परिसरात हा युवक सुमारे १५ मिनिटे वाहनचालकांना आणि नागरिकांना धमकावत होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
देशामध्ये असे प्रकार रोज कुठे न कुठे घडताना पाहायला मिळतात. पण सध्या व्हायरल झालेला हा व्हिडीओ जास्त दूरचा नाहीय. तर तो आहे धाराशिव मधला. एक दिलासादायक बाबही यातून समोर येते की, असे भाई नंतर पोलिस गुडघ्यांवर आणतात. या स्वयंघोषित भाईंना माफी मागायला लागते. त्यामुळं आता धाराशिवमधल्या या प्रकारानंतर पोलिसांनी याही गुंडाच्या मुसक्या आवळल्या आहेत. यानंतर तो नेमका हा प्रकार नेमकं का करत होता, त्याचा उद्देश काय होता? हे जाणून घेणंही महत्वाचं आहे. याशिवाय त्याने हे कृत्य नेमकं केलं तरी का याही प्रश्नाचं उत्तर मिळणं अपेक्षित आहे.
नेमकं काय घडलं?
धाराशिव शहरातील बार्शी नाका या वरदळीच्या चौकात आज सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हातात कोयता घेऊन एका तरुणाने चौकात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. तब्बल पंधरा मिनिटे तो रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना व नागरिकांना धमकावत कोयत्याचे वार करण्याचा प्रयत्न करत होता. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील विद्यार्थी, व्यावसायिक, नागरिक आणि प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती.
दरम्यान, या थरारक प्रकाराची माहिती मिळताच धाराशिव पोलिसांनी अतिशय धाडसाने आणि तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

