कोल्हापुरात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका चुटकीवाला बाबाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या चुटकीवाला बाबाचा शोध आता पोलीस घेत आहेत.
करणी, वशीकरणाचे व्हिडीओ व्हायरल
‘चुटकीवाला बाबा’चे सहा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओत तो जमिनीवर बसलेल्या व्यक्तीच्या कपाळावर हात ठेवून काही मंत्रोच्चार करताना दिसतो; दुसऱ्यात मानवी कवटीचा आधार घेत काही विधी करत असल्याची दृष्ये आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या व्हिडिओत तो स्त्रिया आणि तरुणींवर चिमट्यासारख्या साधनाने स्पर्श करत अघोरी तंत्रविधी करतो आहे. एका दृश्यात त्रिशूल हातात घेऊन काही जप करताना दिसतो. तसेच या व्हिडिओंनी कोल्हापुरात आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
कठोर कारवाईची अंनिसची मागणी
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गीता हसुरकर यांनी सांगितले की, अशा भोंदू बाबांचा प्रभाव निरपराध मुलं, महिला आणि सामान्य नागरिकांवर पडतो. त्यांच्या मानसिक तसेच आर्थिक शोषणाचा हा प्रकार असून याविरोधात कडक कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. नागरिकांनी अशा भोंदूगिरीपासून दूर राहून संशयास्पद बाबी तात्काळ पोलिसांना किंवा समितीला कळवाव्यात, असे त्यांनी आवाहन केले आहे.
पोलीस घेत आहेत बाबाचा शोध
दरम्यान, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी सांगितले की, “या प्रकरणी अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार आली नसली, तरी व्हिडिओंच्या आधारे चौकशी सुरू केली आहे. सध्या तो बाबा कोल्हापूरबाहेर असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून लवकरच त्याचा नवा ठावठिकाणा शोधला जाईल.” तसेच “या बाबाने कुणाची जर आर्थिक किंवा अन्य फसवणूक केली असेल तर पुढे येऊन याबाबत नागरिकांनी पोलिसांना कळवावे,” असे आवाहन देखील झाडे यांनी केले आहे.
मुंबईहून वाराणसी निघालेल्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, 5 विमानतळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाढती भोंदूगिरी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भोंदूगिरीच्या अशा घटना वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. उमेदवारांच्या नावावर करणी, लिंबू कापणे, खिळे मारणे अशा प्रथा समाजात भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. प्रशासन आणि समाजाने एकत्र येऊन या प्रकारांना आळा घालणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
आतली बातमी! शिंदे VS ठाकरे, सुप्रीम कोर्टात आज काय-काय घडलं?
दरम्यान, ‘चुटकीवाला बाबा’ प्रकरणाने कोल्हापुरातील भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेच्या वाढत्या प्रवाहाची गंभीर झलक पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. जनजागृती, कठोर कायदेशीर उपाय आणि सामाजिक सहभाग या तिन्ही साधनांतूनच अशा अंधश्रद्धेचा कायमस्वरूपी बंदोबस्त होऊ शकतो, हे या घटनेने अधोरेखित झाले आहे.

