NCP Ajit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसने प्रवक्तेपदासाठी नवीन यादी जाहीर केल्यानंतर यात अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील यांचे नाव नसल्याने चर्चा सुरू झाली होती. अमोल मिटकरी यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने प्रवक्ते पदासाठी 17 नेत्यांची नावे जाहीर केली. या यादीत आमदार अमोल मिटकरी आणि रुपाली पाटील ठोंबरे यांचं नाव नव्हतं. यामुळे या दोघांनाही पक्षाच्या प्रवक्ते पदावरून डच्चू मिळाल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली. या गच्छंतीनंतर रुपाली ठोंबरे यांची शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे अमोल मिटकरी हेदेखील पक्षांतराच्या विचारात आहेत का, याबाबत अंदाज बांधले जात असून मिटकरी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “मी अजितदादांच्या विचारांचा प्रचारक आणि कार्यकर्ता आहे. हे पद माझ्यासाठी सर्वोच्च आहे. अजितदादांचा कार्यकर्ता असण्यासाठी नशीब लागतं आणि मी तितका नशिबवान आहे,” असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं. ‘हकालपट्टी’ आणि ‘उचलबांगडी’ असे शब्द माध्यमांकडून लावण्यात आले असल्याचं मिटकरींनी म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीकडून नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आल्यानंतर अमोल मिटकरी यांनी आपल्या ‘सोशल मीडिया’ हँडलवरील ‘बायो’मधून ‘प्रवक्ता’ हा उल्लेख काढून टाकला आहे. आता त्यांच्या ‘बायो’मध्ये फक्त ‘सदस्य, विधान परिषद सभागृह’ असा उल्लेख दिसत आहे.
एका वाक्यात विषय संपवला!
राष्ट्रवादीकडून प्रवक्तेपदावरून दूर करण्यात आल्यानंतर अमोल मिटकरी यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर एक शेर शेअर करत आपल्या भावना मांडल्या होत्या. “दुनिया दौडने वालों की है, लेकिन मंजिले सब्र वालों को मिलती है,” असं मिटकरी यांनी म्हटलं होतं.

