राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. या प्रकरणात काँग्रेस नेते सुनील केदार यांना पक्षाने मोठा झटका दिला आहे.
संबंधित पत्रात सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकी संदर्भात नागपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा निवड मंडळाची बैठक झालेली नाही, अशी तक्रार प्रदेश कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरून जिल्ह्याच्या निवड मंडळाची बैठकच झालेली नसल्याने बुधवारी मुंबईत होणाऱ्या राज्य निवड मंडळाच्या समोर नागपूर जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासंदर्भात चर्चा होणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा निवड मंडळाची बैठक १२ नोव्हेंबरला घ्यावी. या बैठकीत जिल्हा प्रभारी, विधानसभा प्रभारी तसेच जिल्हा निवड मंडळातील सदस्यांना आमंत्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीत चर्चा झाल्यानंतर १३ नोव्हेंबर, गुरुवारी दुपारी १२.३० वाजता राज्य निवड मंडळासमोर माहिती सादर करावी, अशा सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर या बैठकीत नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती माजी आमदार वीरेंद्र जगताप घेणार असल्याची माहिती आहे.
नेमकं काय घडलं?
नागपूर जिल्ह्यातील २७ नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुका दोन डिसेंबरला होणार आहेत. त्यासाठी काँग्रेसने जिल्हा निवड समिती तयार केली आहे. त्यात आजी-माजी पदाधिकारी आणि वरिष्ठांचा समावेश आहे. त्यांच्या उपस्थितीत मुलाखती घेतल्या जाव्यात अशी पक्षाची अपेक्षा आहे.
ग्रामीण काँग्रेसने गेल्या आठवड्यात शुक्रवारी कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखतींचे आयोजन केले होते. ते करताना त्यांनी पक्षाच्या निवडणूक निरीक्षकांना बोलावले नाही. तसेच पक्षातील विशिष्ट गटाचे कार्यकर्ते बोलावत त्यांच्या मुलाखती घेतल्या. या बैठकीची तक्रार पक्षातील दुसऱ्या गटाने थेट प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्याकडे केली होती.
यानंतर नागपूर ग्रामीणचे प्रभारी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासोबत जिल्हा प्रभारी उदय मघे आणि वरिष्ठ नेते अशोकराव बोबडे नागपुरात दाखल झाले होते. या बैठकीनंतर काँग्रेसमधील गटबाजी निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा उघड झाली आहे.

