Kolhapur Accident News : कोल्हापुरात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर रिफ्लेक्टर नसल्याने भीषण अपघात झाला. केर्ले-दालमिया मार्गावर पहाटे एका चारचाकीने थांबलेल्या ऊस ट्रॉलीला धडक दिल्याने पाटबंधारे विभागातील लिपिक राजाराम गंधवाले यांचा जागीच मृत्यू झाला.
कोल्हापुरातील केर्ले ते दालमिया साखर कारखाना दरम्यानच्या रस्त्यावर रविवारी पहाटे झालेल्या या भीषण अपघातात कोल्हापूर पाटबंधारे विभागातील लिपिक राजाराम दिनकर गंधवाले (वय 38, रा. कोतोली, ता. पन्हाळा) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ऊसाने भरलेल्या थांबलेल्या ट्रॉलीला त्यांच्या चारचाकी गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला होता.
अखेर ठरलं..! महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एकत्र लढणार, कुणाला किती जागा मिळणार?
देवदर्शनाहून परतताना अपघात..
करवीर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, गंधवाले हे शनिवारी आपल्या मित्रासह गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ते कोतोली फाटा येथे आले. मित्राच्या गाडीतून उतरून त्यांनी स्वतःच्या चारचाकीतून कोतोलीकडे मार्गक्रमण केले. दरम्यान, दालमिया कारखान्याला ऊस पोहोचवून परतीस जाणारा ट्रॅक्टर आसुर्लेजवळ रस्त्याच्या कडेला थांबलेला होता. गंधवाले यांना अंधारात आणि धुक्यामुळे ती ट्रॉली न दिसल्याने त्यांच्या गाडीने थेट ट्रॉलीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत वाहनाचे पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात गंधवाले हे स्टेअरिंग आणि सीटच्या मधोमध अडकले. या अपघातात घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.
Kolhapur News: ‘सरकार घोटाळेबाजांना अभय देतं…’; कोल्हापुरातून विनायक राऊतांनी महायुती सरकारवर डागली तोफ
चालकावर गुन्हा दाखल..
अपघातानंतर ट्रॅक्टर चालक रावसाहेब महादेव काळे (वय 48, रा. तारदाळ, ता. हातकणंगले) हा घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र करवीर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत काळे याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी अपघातातील चारचाकी आणि ट्रॅक्टर दोन्ही वाहने जप्त केली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Kolhapur News : हरवला म्हणून कुटुंबासह गावकऱ्यांनी अख्खं गाव पालथं घातलं, पण 8 वर्षीय रणवीरबाबत वेगळीच माहिती समोर; कोल्हापुरात काय घडलं?
निष्काळजीपणाच ठरला कारणीभूत..
प्राथमिक तपासात ट्रॅक्टर ट्रॉलीवर आवश्यक प्रतिबिंबक (रिफ्लेक्टर) किंवा इशारे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रात्रीच्या वेळी धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने आणि ट्रॉली रस्त्याच्या कडेला विनासंकेत उभी असल्याने हा अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
‘मर्डर निश्चित 2025’; स्टेटस अन् रील्समधून कॉलेजमध्ये दहशत; पोलिसांनी मस्ती जिरवली, धिंड काढली आणि नंतर…
गावावर पसरली शोककळा
राजाराम गंधवाले हे कोल्हापुरातील पाटबंधारे विभागात लिपिक म्हणून कार्यरत होते. सामाजिक कार्यातही ते सक्रिय होते. त्यांनी कोतोली येथे ‘कोतोली को-ऑप्रेटिव्ह सोसायटी’ स्थापन करून संस्थापक अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा परिसरात मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या निधनाने कोतोलीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. पत्नी प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत.
प्रशासनाकडून रस्ते सुरक्षेसाठी आवाहन
दरम्यान ऊस हंगामात वाढलेल्या ऊस वाहतुकीमुळे अशा अपघातांचे प्रमाण चिंताजनक ठरत आहे. पोलिस प्रशासनाने ऊस वाहतूकदारांना सुरक्षाविषयक नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे. तर ट्रॉलीसह सर्व कृषी वाहनांवर प्रतिबिंबक आणि दिवे लावणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

