स्वप्न खरं होतं हे दाखवून दिलं इचलकरंजीच्या तन्मय मांडरेकर या तरुणाने. इयत्ता चौथीत वडिलांचं छत्र हरपलं. आईने अंगणवाडी सेविका म्हणून काम केलं. वेळप्रसंगी तन्मयने पेन विकले. प्रचंड मेहनत केली. आज त्याच मेहनतीच्या जोरावर यश संपादीत केलं.
आई आणि आजीच्या कष्टावर उभं राहिलेलं स्वप्न
तन्मयच्या आयुष्याची वाटचाल लहानपणापासूनच संघर्षमय होती. वयाच्या चौथ्या वर्षी वडील अनिल मांडरेकर यांच्या निधनानंतर आई राधिका आणि आजी हौसाबाई यांनी घराचा भार आपल्या खांद्यावर घेतला. घरात उत्पन्नाचं साधन नसताना राधिका यांनी अंगणवाडी सेविकेचं काम स्वीकारून दोन मुलांना शिक्षणासाठी स्वतःला झोकून दिलं. “माझा मुलगा अधिकारी व्हावा, हेच स्वप्न होतं. तेच स्वप्न आता साकार झालं आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी व्यक्त केले आहेत.
प्रत्येक वर्गात पहिल्या क्रमांकावर
तन्मयने शिक्षणात नेहमीच अव्वल क्रमांक मिळवत प्रगती केली आहे. दहावीत 98 टक्के गुण मिळवत तन्मय विभागात पहिला आला आणि बारावीनंतर पुण्यातील सीओइपी महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. या प्रवासात तो सदैव अभ्यासात गुंतलेला राहिला. 2022 मध्ये त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आणि पूर्वतयारीसाठी वृत्तपत्रांचा सखोल अभ्यास हा त्याचा दैनंदिन भाग असायचा. पहिल्याच प्रयत्नात 2023 मध्ये राज्यसेवेच्या गटविकास अधिकारी पदावर तो पात्र ठरला, तर 2024 च्या निकालात राज्यात प्रथम येण्याचं स्वप्न त्यांनं साकार केलं आहे.
बालपणीच कष्टाचे धडे
घर चालविण्यासाठी तन्मयनं दहावीच्या सुट्टीत स्थानकावर पेन विकण्याचंही काम केलं आहे. लहानपणीच जीवनात कठोर परिश्रमाची शिकवण घेतलेला हा तरुण आज संपूर्ण कोल्हापूर विभागासाठी प्रेरणास्थान ठरला आहे. “त्याने नेहमी वाचनाची सवय ठेवली आणि प्रत्येक गोष्टीत शिकण्याची आवड दाखवली,” असा अभिमान त्याचे मामा अभिजीत साळुंखे व्यक्त करतात.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली घडण्याचे संकेत, उद्याच्या मोर्चानंतर ठाकरे बंधूंची मोठी रणनीती
प्रयत्नांतून यशाकडे वाटचाल
“कोणत्याही गोष्टीत अपयश हे पचवता आलं पाहिजे. अपयशानंतर पुन्हा नव्याने प्रयत्न करुन यश खेचून आणता येते”, अशा भावना व्यक्त करणारा तन्मय सध्या पुण्यातील यशदा संस्थेत गटविकास अधिकारी पदाचं प्रशिक्षण घेत आहे. त्याची बहीण रेवती माने शाहुवाडीत जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षिका म्हणून काम पाहते.
संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड, नरेंद्र मोदी यांचं काळजीचं ट्विट, नेमकं काय म्हणाले?
दरम्यान, प्रतिकूल परिस्थितीतून उभे राहून मिळवलेल्या या चमकदार यशामुळे तन्मय मांडरेकरवर इचलकरंजीसह कोल्हापूर जिल्ह्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या यशामागे असलेली आईची जिद्द आणि मुलाची मेहनत भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी आणि आदर्श ठरत आहे.

