Kopargaon Young Man Deceived by the Lure of Marriage : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच, अहिल्यानगरमधील कोपरगाव येथे एक संतापजन प्रकार समोर आला आहे. लग्नाचं आमिष देऊन एका टोळीने तरुणाला फसवलंय. त्याच्याकडून सव्वा दोन लाख रुपये उकळले आहेत.
काय आहे नेमकी घटना?
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव येथील एका अविवाहित तरुणाला लग्नासाठी मध्यस्थांमार्फत एक तरुणी दाखवण्यात आली. 8 ते 11 ऑक्टोबरदरम्यान चर्चा आणि हे लग्न पार पडले आणि तरुणाकडून मध्यस्थांनी सव्वा दोन लाख रुपये घेतले. मात्र, लग्नाच्या पहिल्याच रात्रीच्या, पहाटेच्या सुमारास ‘नवरी’ घरातून पसार झाली. सकाळी फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांनी मध्यस्थांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. अखेर तरुणाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
‘बारामतीकरांनो चोर पकडा, 1 लाख रुपये मिळवा’, विकासकामांच्या चोऱ्यांमुळे वैतागलेल्या अजित पवारांची खुली ऑफर
‘मास्टरमाईंड’ महिलेला अटक
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील आरोपी महिला ज्योती राजू गायकवाड ही 16 ऑक्टोबर रोजी कोपरगावात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. कोपरगाव तालुका पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने ज्योती राजू गायकवाड हिला ताब्यात घेतलं. याच रात्री तिच्यासह, बनावट नवरी आणि तीन पुरुष साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे करीत आहेत. इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
Pune News: पेटशॉपमध्ये आंघोळ केली, उलट्या अन् ‘डॅश’चा जीव गेला; पुणे हळहळलं, पाहा नेमकं काय घडलं?
अविवाहित तरुणांनो, सावधान!
‘अविवाहित तरुणांनो लग्नाचं आमिष दाखवून होणाऱ्या फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करा! मागील काही वर्षांपासून अविवाहित तरुणांना लग्नाचे खोटे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. केवळ पैसे उकळण्यासाठी काही टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. अशा घटना समाजासाठी अत्यंत चिंताजनक आहेत आणि यावर वेळीच कठोर उपाययोजना करणं गरजेचं आहे’, असं आवाहन पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी केलं आहे.

