नागपूरमधून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय विद्यार्थ्याचा क्रिकेट खेळताना छातीला चेंडू लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
अचानक चेंडू त्याच्या छातीला लागल्याने तो जमिनीवर कोसळला. त्याला मित्रांनी तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दोन महिन्यांपूर्वी त्याचे वडील मिरची व्यापारी अनिल आगलावे यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यामुळे या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून संपूर्ण भिवापूरवर शोककळा पसरली आहे.
दिवाळीपूर्वी उपराजधानीत रक्ताचा सडा, २४ तासांत दोघांची हत्या
दुसरीकडे दिवाळीचा सण तोंडावर आला असताना २४ तासांत शहरातील दोन विविध भागांत दोघांची हत्या करण्यात आली. यातील एक घटना इमामवाडा तर दुसरी नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. एका घटनेत अल्पवयीन मुले आरोपी आहेत. यामुळे शहरातील पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
पहिली घटना इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. नीलेश ऊर्फ बाळा किरण अंबाडारे (३४, रा. इंदिरानगर, जाटतरोडी, गल्ली क्रमांक दोन) असे मृतकाचे नाव आहे. तो कुख्यात गुंड असून त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याचा दोन अल्पवयीन मुलांशी पैशावरून वाद सुरू होता. या दोघांनी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास नीलेशच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यानंतर दोघांनी त्याच्यावर तिक्ष्ण शस्त्रांनी हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला.
दुसरी घटना नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. विवेक तांडेकर (२७) असे मृतकाचे नाव आहे. त्याचा आरोपी देवा वंजारी याच्यासोबत अनेक दिवसांपासून वाद होता. मध्यरात्रीच्या सुमारास नेरी गावाजवळील वीटभट्टीजवळ दोघांमध्ये वाद झाला. त्यातून वंजारीने विवेकवर तिक्ष्ण शस्त्रांनी हल्ला केला. यात विवेकचा मृत्यू झाला. पोलिसांनी देवा वंजारीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या दोन्ही घटनांमुळे संबंधित परिसरात काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. शहरातील कायदा व्यवस्था मजबूत स्थितीत असल्याचे दावे वरिष्ठ पोलिसांनी केले आहेत. मात्र, दिवाळीच्या तोंडावर शहरात होत असलेल्या हत्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

