Nanded Crime: नांदेडमध्ये पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दारू पाजवून प्रियकराने महिलेच्या पतीला नदीत फेकून दिले. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी व प्रियकराला अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
नांदेडमधील किनवट शहराच्या मथुरानगर येथील रहिवाशी विनोद किसन भगत (वय 52) यांचे प्रियंका नामक महिलेशी सन 2003 मध्ये लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे अपत्यही आहेत. गोकुंदा उपजिल्हा रुग्णालय परिसरातील अशोकनगर येथे विनोद भगत यांच्या मालकीचे चार खोल्याचे आरसीसीचे घर होते.
Nanded News : वृद्ध दाम्पत्याची दुग्ध व्यवसायातील यशोगाथा, 70 वर्षा पूर्वी दोन म्हशींनी सुरुवात, आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल
सदर घर विनोद यांची पत्नी प्रियंका भगत हिने तिच्या ओळखीतल्या शेख रफीक शेख रशीद याच्या मदतीने 30 लाखाला विकले. याच व्यवहारावेळी शेख रफीक याने प्रियंका भगत हिच्याशी जवळीक साधली. पैशाच्या कारणावरून विनोद, प्रियंका या पती पत्नीत वाद होत असे. दरम्यान, रफीक व प्रियंकाच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. याची कुणकुण विनोद यांना लागली होती. यावरून दोघांमध्ये नेहमी भांडण देखील व्हायचे. शेवटी पतीचा काटा काढण्याचा निर्णय पत्नी आणि तिच्या प्रियकराने घेतला. दोघानी मिळून कट रचला. 29 ऑगस्ट रोजी आरोपी शेख रफिक याने विनोदला घेऊन मराठवाडा आणि विदर्भला जोडणाऱ्या पैनगंगा येथील खरबी पुलावर पोहचला. त्यानंतर आरोपीने विनोदला दारू पाजवली आणि पुलावरून नदीत फेकून दिले.
घटनेच्या चार दिवसानंतर म्हणजेच 3 सप्टेंबर रोजी पत्नी प्रियंका हिने किनवट पोलीस ठाण्यात पोहोचून आपला पती चार दिवसांपासून गायब असल्याचा बनाव केला. पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करत विनोद भगत याचा तपास सुरू केला. याच दरम्यान पोलिसांना पैंनगंगा नदीत त्याचा मृतदेह आढळून आला. इकडे मयताच्या बहिणीने घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी फोन कॉल तपासले असतात मयताच्या पत्नीच्या मोबाईलवरून आरोपी रफिक सोबत नेहमी संवाद होत होता.
दरम्यान, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. खाकी वर्दीचा धाक दाखवताच दोघांनी खुनाची कबुली दिली. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने विनोद भगत याचा काटा काढल्याचे दोघांनी सांगितले. या प्रकरणी किनवट पोलिसांनी खुनाचा आणि अॅट्रॉसिटीसह इतर कलमान्वये गुन्हे दाखल गुन्हा दाखल केला आहे.

