जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पभूधारक शेतकऱ्याने नैसर्गिक आपत्ती आणि कर्जाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील चित्तर वडगाव येथील अल्पभूधारक शेतकरी शिवाजी बाबुराव यादव यांच्याकडे वडिलोपार्जित 1 एकर 15 गुंठे जमीन आहे. या जमिनीत पत्नी आणि आपल्या मुलाबाळांसोबत ते राबराब राबवून आपल्या संसाराचा गाडा हाकलत होते. मात्र दोन वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांना किडनीचा आजार झाला.
वडिलांच्या किडन्या फेल झाल्या यात लाखो रुपये खर्च करून त्यांनी वडिलांना वाचवण्याचा अतोनात प्रयत्न सुरू केला. या प्रयत्नात असतानाच दोन मुली सुद्धा लग्नावर आल्या. आता या मुलींचं लग्न कसं होणार? या चिंतेत ते सतत राहू लागले आणि पुन्हा त्यांनी खरिपाची पेरणी केली. खरीपाची पेरणी करत असताना त्यांनी एका सावकाराकडून उधार पैसे घेऊन पेरणी केली, पीक चांगले आले. शेतातील कपाशी डोलू लागली. आता दिवाळी आणि आपल्या मुलाबाळांचे शिक्षण योग्य प्रकारे या पिकांवर अपण करू शकतो, अशी अपेक्षा बाळगून ते या शेतात राबू लागले. मात्र नियतीला काही हे मान्य नव्हतं आणि मागच्या हप्त्यात संपूर्ण जालना जिल्ह्यात आणि मराठवाड्यात धुवांधार पाऊस झाला.
या पावसात त्यांची कपाशीचे संपूर्ण पिक होत्याच नव्हतं झाल्याचं चित्र त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं. याच विवंचनेत ते गेल्या 8-10 दिवसापासून शेतात रोज चकरा मारत एकटेच बसत होते. यावेळी त्यांची पत्नी त्यांची समज काढत होती. वडील सुद्धा समजूत काढत होते की, काहीतरी बदल होईल. पण त्यांनी आज राहत्या घरी दुपारी बारा वाजता विषारी औषध प्राशन केले. ही बाब घरच्यांच्या आणि आस पासाच्या रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्यांना खाजगी गाडीत टाकून जिल्हा रुग्णालयात आणलं.
यावेळी डॉक्टरांनी त्यांच्यावर शर्तीचे प्रयत्न केले. पण उपचार सुरू असताना त्यांची प्रांणजोत मालवली आणि या शेतकऱ्याने जगाचा निरोप घेतला. याप्रकरणी जालना जिल्हा रुग्णालयातील चौकीमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. मयत शिवाजी यादव यांच्या पाश्चात वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा मोठा परिवार आहे.

