Dhananjay Munde Speech: राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात बोलताना आरक्षणावर परखड भूमिका मांडली. मराठा आरक्षणाला विरोध नसून, दुसऱ्या समाजाच्या ताटातलं काढून मराठ्यांना देऊ नये, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
दसरा मेळाव्यात आरक्षणावर भूमिका मांडताना धनंजय मुंडे म्हणाले की, “मी विद्यार्थी चळवळीत असल्यापासून ज्या ज्या समाजाच्या आरक्षणा प्रश्न आला त्या त्या वेळी आम्ही त्या सर्व समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात भाग घेतला आहे. सरकारने आता मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे. आम्हालाही या निर्णयाचा आनंद झाला, कारण मराठा आरक्षणाच्या लढ्यात मीही आधीपासून सहभागी होतो आणि ही गोष्ट कोणापासूनही लपून राहिलेली नाही. पण काही जणांना या आरक्षणाच्या आडून ओबीसीमधून आरक्षण घ्यायचं आहे. तुम्हाला मी उदाहरण सांगतो. नुकत्याच झालेल्या एमपीएससी परीक्षेच्या निकालात मराठा समाजाला आधी मिळत असलेल्या ईडब्ल्यूएस आरक्षणापेक्षाही ओबीसींचे मेरिट जास्त लागले. मग तुम्ही नक्की कोणाला फसवताय? स्वत:ला खुर्ची मिळावी यासाठी ठराविक लोकांकडून ही फसवणूक केली जात आहे,” असा घणाघात मुंडे यांनी केला आहे.
आरक्षणावरून हल्लाबोल करताना धनंजय मुंडेंनी पुढे म्हटलं की, “मराठा समाजातील लहान मुलांना शिक्षणासाठी, नोकरीसाठी जे करायचं ते सरकारने केलंय, अजूनही करतंय. मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिलं, अजूनही द्या, आमचं काहीही म्हणणं नाही, पण याच्या ताटातलं काढून त्याला द्या, हे चालणार नाही,” अशी परखड भूमिका धनंजय मुंडेंनी मांडली आहे.
“जिल्ह्यातील वातावरण निवळण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार”
बीड जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून निर्माण झालेल्या जातीय तणावाबाबत धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. “बीडमध्ये दोन जातीतील मित्रांची मैत्री संपली आहे. एका जातीतला माणूस दुसऱ्या जातीतल्या माणसाकडे बघत नाही. जाती-धर्मात निर्माण झालेला हा द्वेष आपल्याला संपवायचा आहे,” असं आवाहन मुंडे यांनी केलं.

