शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा आज पार पडला. या दसरा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थिती लावतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर त्याचं उत्तर आता मिळालं आहे.
“शिवसेनाप्रमुख बाळासाहे ठाकरे यांचं आपल्याकडे लक्ष आहे. 68 वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची जी ठिणगी टाकली त्याचा हा पेटलेला वणवा मुसळधार पावसात सुद्धा विझू शकत नाही हे आपला संपूर्ण देश पाहतोय. आतापर्यंत नेत्यांची भाषण झाली की मग पाऊस पडता. पण या इथे पाऊस, वादळ असताना हा मेळावा आपण करतोय आणि हजारोंच्या संख्येने आपण इथे जमलेला आहात. हे शिवतीर्थ आपलं आहे आणि शिवतीर्थ फक्त आपल्या शिवसेनेचं आहे. या शिवतीर्थाच्या पलिकडे आणखी एक शिवतीर्थ आहे. ते सुद्धा आपलंच मानायला पाहिजे”, असं संजय राऊत म्हणाले.
“हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुखांनी ज्या शिवसेनेची स्थापना या शिवतीर्थावर केली, त्या शिवसेनेचा दसरा मेळावा ही महाराष्ट्राची परंपरा आहे. मराठी माणसाची भक्कम एकजूट ज्या शिवसेनाप्रमुखांनी केली त्या शिवसेनेला हादरे देण्याचा प्रकार कुणी कितीही केला तरी त्या हादऱ्यामध्ये आपण संपून जाणार आहात. मला आज अनेकांनी प्रश्न विचारले, शंका उपस्थित केल्या. शिवतीर्थावर चिखल झालेला आहे म्हणजे तुम्ही चिखलफेकच करणार. मी म्हटलं, होय. गद्दारांवर चिखलफेकच करणार. त्यांची तीच लायकी आहे”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
“संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे. मराठवाडा संपूर्ण पाण्यात आणि चिखलात आहे. आठ-आठ दिवस शेतकरी चिखलात आहे. आपण दोन तास पाण्यात आणि चिखलात ही सभा घेतली तर आपल्याला वाईट वाटण्याचं कारण नाही. महाराष्ट्रात ओला दुष्काळ असेल तर हा आमचा ओला दसरा मेळावा आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
“रावणाचा आज अंत करायचा आहे. नेहमी रावणाचं दहन होतं. आता या पावसात रावणाचं दहन कसं करायचं, रावणाला जाळायचं की रावणाला बुडवायचं हा विचार करावा लागेल. या मुंबईत पाऊस आहे. या मुंबईत रावणाला बुडवायचा आणि दिल्लीतल्या रावणाला जाळायचा”, असं राऊत म्हणाले.
राज ठाकरे दसरा मेळाव्यात गैरहजर, सोबत येणार की नाहीत? उद्धव ठाकरेंची सर्वात मोठी घोषणा
“उद्धव ठाकरेंनी शस्त्र पूजा केली आहे. शस्त्रपूजा करण्याचा अधिकार हा हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला आहे. मला विचारलं गद्दारांच्या मेळाव्यात पूजणार? मी म्हटलं त्यांना शस्त्र पूजा करण्याचा अधिकार असूच शकत नाही. मग ते काय पूजणार? मला सांगण्यात आलं, त्यांनी दिल्लीतून अमित शाह यांचे जोडे आणले आहेत. चपला आणल्या आहेत. त्यांचं पूजन ते करणार आहेत. आम्ही शस्त्र पूजा केली. ते अमित शाह यांच्या पादुकांच्या पूजा करत आहेत. जो तो आपल्या लायकीनुसार वागतो आणि जगतो. हा निष्ठावंतांचा मेळावा आहे”, असं भाषण संजय राऊत यांनी केलं.

