Shirdi Sai Santhan Relief fund to Flood Affected : मराठवाडा आणि सोलापूरला पावसाने झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतशिवार पाण्याखाली गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. संत गजानन महाराज संस्थानने १ कोटी, लालबागच्या राजाने ५० लाखांची मदत जाहीर केली. आता शिर्डी साईबाबा संस्थाननेही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ कोटींची मदत दिली आहे. राहाता तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी भक्तनिवास आणि साईप्रसादायल खुले केले आहे.
मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्याला पूर्णत: पुराने वेढले आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अनेकजण बेघर होऊन रस्त्यावर आले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे विदारक चित्र निर्माण झाले आहे. या अतिवृष्टीतील बाधितांसाठी शिर्डी संस्थानने एक कोटींची मदत जाहीर केली आहे. जी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पाठवण्यात येणार आहे. यासोबतच राहाता तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी भक्तनिवास आणि साईप्रसादायल खुले असणार आहे.
गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्यात पावसाची कोसळधार सुरुच आहे. जो या हंगामातील सर्वाधिक पाऊस आहे. पावसामुळे कापणीच्या तोंडावर पीक पाण्याखाली गेली आणि शेतकऱ्याची चिंता वाढली. मायबाप सरकारने आर्थिक नुकसानी पाहता त्याची भरपाई द्यावी, अशी आर्त मागणी केली जात आहे.
शेगावच्या गजानन महाराज संस्थानने देखील सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे. संस्थानच्या वतीने पुरग्रस्तांच्या तब्बल १ कोटी ११ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सोपविण्यात आला आहे. संस्थेचे प्रतिनिधी यांनी २७ सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मदतीचा धनादेश सुपूर्द केला आहे.

