Dhananjay Munde word of patience with Farmer : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. तेलसमुखमध्ये कापसाचे पीक वाया गेल्याने एका शेतकरी महिलेने धनंजय मुंडे यांच्यासमोर व्यथा मांडली. मुंडे यांनी मदतीचे आश्वासन दिले. तसेच, ममदापूर येथील पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शेतकरी महिलेने हाती आलेले संपूर्ण पीक नासले, लाखांवर नुकसान झाले भाऊ, आता लेकीचे लग्न कसे लावू? असा प्रश्न शेतकरी महिलेने मुंडेंसमोर उपस्थित केला. यावर धनंजय मुंडेंनी धीर देत म्हटले की, ‘शासन आपली मदत करेल अक्का, पण मुलीच्या लग्नाची काळजी करू नका, ठरलेल्या वेळीच लग्न होईल, त्याच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी मी घेतो.’ रेखाबाई तुकाराम कदम असे शेतकरी महिलेचे नाव आहे. त्यांच्या शिवारातील कापसाचे पूर्ण पीक पाण्याने नासले आहे.
BIG BREAKING : महाराष्ट्रात अतिवृष्टी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केंद्राला निवेदन पाठवत मोठी मागणी, उद्या दिल्लीलाही जाणार
परळी तालुक्यात गोदावरी नदीला पूर आल्याने आजूबाजूच्या गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर वाण नदीसह लहान मोठ्या सर्वच नद्यांना पूर आला आहे. परिणामी शेतामध्ये पाणी शिरल्याने माती खरडून गेली आहे, काही ठिकाणी नदीतील दगड गोटे शेतात वाहून आलेत तर अजूनही पिकांमध्ये गुडघाभर पाणी साचलेले आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी तेलसमुख, ममदापूर, बोरखेड आदी गावांना भेटी देऊन स्थानिकांशी संवाद साधला. नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने योग्य पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
दरम्यान, ममदापूर येथील ३८ वर्षीय तरुण शिवराज कदम हा 16 सप्टेंबरला पुराच्या पाण्यात रात्री कौडगाव हुडा येथील नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत पावला. त्या तरुणाच्या कुटुंबीयांना आज प्रशासनाच्या वतीने ४ लाख रुपयांची आर्थिक मदत धनंजय मुंडे यांच्या हस्ते कुटुंबाला देण्यात आली. सदर रक्कम मयत शिवराज कदम यांच्या पत्नीच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या सह महसूल, कृषी, पोलीस आदी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

