• Mon. Jun 15th, 2026

    शाही दसरा कोल्हापूरचा : गौरव परंपरेचा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Sep 18, 2025
    शाही दसरा कोल्हापूरचा : गौरव परंपरेचा – महासंवाद

    कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा उत्सव आहे, ज्याला यावर्षी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यातील प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळालेल्या या उत्सवाला पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने राज्याच्या पर्यटनात्मक प्रसिद्धीच्या दृष्टिकोनातून विशेष स्थान दिले आहे. या विभागाने तयार केलेल्या दिनदर्शिकेत कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाला राज्यातील १८ प्रमुख महोत्सवांमध्ये समाविष्ट केले आहे. शाही दसरा महोत्सवात पर्यटकांना कोल्हापूरच्या स्थानिक कला, संस्कृती आणि परंपरांना आपलेसे वाटावे यासाठी दरवर्षी स्थानिक कलाकारांना प्राधान्य दिले जाते. मराठी परंपरेचा गौरव करीत नवरात्र-विजयादशमी-दसरा मोठ्या उत्साहाने जिल्हा प्रशासन महोत्सवाच्या माध्यमातून साजरा करीत आहे. विजयादशमी दिवशी ऐतिहासिक दसरा चौकात सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो तर संपुर्ण नवरात्र कालावधीत दररोज विविध लोककलेतील कार्यक्रम प्रशासनाकडून आयोजित केले जातात.

    एक नाही अनेक

    कोल्हापूर शहराला पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला असून हे शहर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. ज्याप्रमाणे देशात म्हैसूरचा दसरा प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे कोल्हापूरचा दसरा महोत्सव शाहू महाराजांच्या काळापासून साजरा केला जात आहे. कोल्हापूरमध्ये साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले श्री अंबाबाई मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. शारदीय नवरात्रोत्सवात श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून आणि राज्यातून ३० ते ४० लाख पर्यटक येतात. याशिवाय, कोल्हापूर जिल्ह्यात नुकताच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेला मराठा लष्करी भूप्रदेशातील पन्हाळगड किल्ला, श्री क्षेत्र जोतीबा मंदिर, गव्यांसाठी प्रसिद्ध दाजीपूर अभयारण्य, कणेरीमठ, आंबा घाट आणि खिद्रापूर येथील स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले कोपेश्वर मंदिर अशी अनेक पर्यटनस्थळे येथे आहेत.

    कलात्मक वारसा

    कोल्हापूर, ज्याला दक्षिणेची काशी म्हणूनही ओळखले जाते, हे पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या राजवटीने हे शहर ओळखले जाते. येथील संस्कृती शौर्य, धार्मिक श्रद्धा आणि कलात्मक वारशाचा संगम आहे. स्थानिक लोकांचा स्वभाव सहनशील, अतिथ्यशील आणि परंपरांचे रक्षण करणारा आहे. कोल्हापूरची कला ही हस्तकला आणि लोककलांवर आधारित आहे. येथील कारागीर पिढ्यान्पिढ्या आपली कौशल्ये जपत आहेत. कोल्हापुरी चप्पल ही जगप्रसिद्ध हस्तकलेतील चामड्याची चप्पल आहे, जी नक्षीकाम, टिकाऊपणा आणि आरामासाठी ओळखली जाते. ही चप्पल पारंपरिक वेशभूषेसोबतच आधुनिक फॅशनमध्येही वापरली जाते आणि ती पर्यटकांसाठी लोकप्रिय स्मृतीचिन्ह सुद्धा आहे. कोल्हापुरी साज हा सोन्याचा हार स्त्रीसौंदर्याचे प्रतीक आहे, ज्यामधील नक्षीकाम आणि डिझाइन स्थानिक कारागिरांची कला दर्शवतात. याशिवाय, लाकडी कोरीव काम, मातीची भांडी, सोन्या-चांदीचे दागिने, कापडावर ब्लॉक प्रिंटिंग आणि पितळी पाट्या येथे प्रसिद्ध आहेत. शहरातील टाउन हॉल म्युझियममध्ये या कलांचे संग्रह आणि प्रदर्शन आहे, जिथे प्राचीन शिल्पे, शस्त्रे आणि चित्रे पाहायला मिळतात.

    विजयादशमी दसरा

    महोत्सवातील प्रमुख उत्सव दरवर्षी विजयादशमीला दसरा चौकात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून चालत आलेली ही परंपरा कोल्हापूरच्या वैभव आणि शौर्याचे प्रतीक आहे. न्यू पॅलेसपासून सुरू होणारी शाही मिरवणूक हा या सोहळ्याचा मुख्य आकर्षणाचा भाग आहे. या मिरवणुकीत छत्रपतींच्या कुटुंबातील वंशज, त्यांचे प्रतिनिधी, पारंपरिक वेशभूषेत सहभागी होतात. सजवलेले हत्ती, घोडे आणि छत्रपतींची मेबॅक कार किंवा पारंपरिक बग्गी यांचा समावेश मिरवणुकीत असतो. मिरवणुकीत पुरुष केशरी रंगाचे फेटे, कुर्ता आणि पायजमा किंवा धोतर परिधान करतात, तर स्त्रिया नऊवारी साड्या घालतात, ज्या कोल्हापूरच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहेत. ढोल-ताशांच्या गजरात सादर होणाऱ्या लोककला कोल्हापूरच्या लोकजीवनातील उत्साह आणि ऊर्जा दर्शवतात. सोहळ्याचा सर्वात मोठा आकर्षणाचा भाग म्हणजे सोने लुटणे. यावेळी सर्वजण एकमेकांना भेटून आपट्याच्या पानांची देवाणघेवाण करुन दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. पर्यटकांसाठी हा उत्सव कोल्हापूरचा इतिहास, संस्कृती आणि परंपरांचा अनुभव घेण्याची उत्तम संधी आहे.

    लोकसंस्कृतीचा भाग

    कोल्हापूरची संस्कृती ही राजघराण्याच्या वैभवाशी, धार्मिक श्रद्धेशी आणि लोकजीवनाशी जोडलेली आहे. येथील संस्कृती विविधतेने परिपूर्ण आहे आणि मराठी चित्रपटसृष्टीसाठीही ती ओळखली जाते. श्री अंबाबाई मंदिर हे शहराचे मुख्य केंद्र आहे, जे १२०० वर्षांहून अधिक जुने आहे. छत्रपती शाहू महाराजांची सामाजिक सुधारणांची परंपरा येथील संस्कृतीत दिसून येते. येथील तांबडा-पांढरा रस्सा, कोल्हापुरी मिसळ, मटण थाळी आणि गूळ हे खाद्यसंस्कृतीत विशेष प्रसिद्ध आहेत. भाकरी आणि झणझणीत मसालेदार जेवण हे येथील लोकसंस्कृतीचा भाग आहे. कोल्हापुरी मानाचा फेटा येथील पारंपरिक पेहरावात प्रचलित आहे. कुस्ती ही येथील प्रमुख सांस्कृतिक परंपरा आहे, आणि गंगावेश, मोतीबाग तालीम यांसारख्या अखाड्यांमध्ये कुस्त्यांच्या स्पर्धा आयोजित होतात.

    पारंपरिक सांस्कृतिक मेजवानी

    शाही दसरा महोत्सव २०२५ अंतर्गत कोल्हापूर येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबर मर्दानी खेळ प्रात्यक्षिके, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, शिल्पकला, चित्रकला, निबंध, रांगोळी इत्यादी स्पर्धा, तरुणाईच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी रील्स स्पर्धा, महिलांची बाइक रॅली, साहसी खेळ प्रकार- पारंपरिक होड्यांची स्पर्धा, नशामुक्त कोल्हापूर अभियानांतर्गत भव्य मॅरेथॉन, समाज प्रबोधनपर पथनाट्य स्पर्धा तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनास चालना देण्यासाठी परिसंवाद इत्यादी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटकांना व सामान्य नागरिकांना कोल्हापूरचे वैशिष्ट्य असणाऱ्या चित्रनगरीची मोफत सफर आयोजित करण्यात आलेली आहे. कोल्हापुरी संस्कृती व परंपरांचे जतन करण्यासाठी एक दिवस सर्व जिल्हाभर पारंपरिक वेशभूषा दिवस साजरा करण्यात येणार आहे.

    दि. २२ सप्टेंबर रोजी दसरा महोत्सवाचे उद्घाटन ऐतिहासिक दसरा चौक मैदानात होणार असून, एकूण ५ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन भव्य अशा मंचावर होणार आहे. तसेच संपुर्ण नवरात्रीत अनेक इतर कार्यक्रत आयोजित करण्यात आले आहेत. प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्थेसह भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग व भारत सरकारच्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील दहा राज्यांमधील प्रसिद्ध लोककला व लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यासाठी प्रसिद्ध कलाकारांचे समूह कोल्हापूरात येणार आहेत. कोल्हापूरच्या नागरिकांसाठी व पर्यटकांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे.

    प्रसिद्ध कलाकार व शाहिर श्री रामानंद उगले यांचा ‘पंचगंगातीरी आम्ही कोल्हापूरी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच यावर्षी कोल्हापूर संस्थानच्या संस्थापिका व स्वराज्य रक्षिता छत्रपती महाराणी ताराराणी यांचे ३५० वे जयंती वर्ष असल्याने त्यांच्या जीवनावर व कर्तृत्वावर आधारित भव्य असे ‘भद्रकाली ताराराणी’ महानाट्य २४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. संपूर्ण शाही दसरा महोत्सवात दिवसभर विविध स्पर्धा आणि इतर कार्यक्रम आयोजित केले जातात, तर दररोज सायंकाळी दसरा चौक येथे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी तसेच देशभरातून येणाऱ्या भाविक व पर्यटकांनी या सर्व उत्कृष्ट कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा व कोल्हापूरचा शाही दसरा जगप्रसिद्ध करावा, असे आवाहन पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

    0000

    -सचिन अडसूळ,

    जिल्हा माहिती अधिकारी,

    कोल्हापूर

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed