• Sun. Mar 8th, 2026

    लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा मोठ्या अडचणीत, फसवणुकीचा गुन्हा दाखल, अटकेनंतर पोलीस कोठडीत रवानगी

    लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा मोठ्या अडचणीत, फसवणुकीचा गुन्हा दाखल, अटकेनंतर पोलीस कोठडीत रवानगी

    लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा हे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात मुंबई गुन्हे शाखेकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कोर्टाने त्यांना 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने वरळीत मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेने आज लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक केली. राजेंद्र लोढा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्यांना आज कोर्टातही हजर करण्यात आलं. कोर्टाने राजेंद्र लोढा यांना 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती समोर आली आहे. राजेंद्र लोढा यांच्यावर लोढा डेव्हलपर्स लिमिटेड (एलडीएल) या कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी राजेंद्र लोढा यांच्यासह त्यांचा मुलगा साहिल लोढा आणि अन्य काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    राजेंद्र लोढा यांच्यावर गंभीर आरोप आहेत. लोढा यांनी संचालकपदाचा गैरवापर करुन अनेक गैरप्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र लोढा हे सीईओ अभिषेक मंगल प्रभात लोढा यांचे दूरचे (चौथ्या पीढीतील) नातेवाईक असल्याची माहिती आहे. राजेंद्र लोढा यांच्यावर ठाणे जिल्ह्यातील जमीन अधिग्रहणाची जबाबदारी होती. हे काम करत असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन मोठ्या प्रमाणात रक्कम लुटली आणि संपत्ती जमवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    कंपनीच्या अलिकडे झालेल्या आंतरिम लेखापरीक्षणात राजेंद्र लोढा यांच्या एका व्यवहारात मोठी तफावत असल्याचं आढळलं. कंपनीने याची गंभीर दखल घेतली. कंपनीने या प्रकरणी प्राथमिक चौकशी केली आणि लोढा यांना आपल्या मालमत्ता आणि गुंतवणुकीचा तपशील सादर करण्यास सांगितले. लोढा यांनी सुरुवातीला तपशील देण्यास नकार दिला. तसेच त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर त्यांनी कंपनीतील संचालक आणि प्रवर्तक पदाचा राजीनामा दिला.

    या प्रकरणी कंपनीकडून मुंबई पोलिसांत तक्रार करण्यात आली. त्यानंतर मुंबईच्या एन. एम. जोशी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हादेखील दाखल करण्यात आला. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये राजेंद्र लोढा आणि त्यांचा पुत्र साहिल यांनी एलडीएल कंपनीत कोणकोणत्या प्रकारे फसवणूक केली, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आरोपी लोढा पिता-पुत्रांनी कल्याण आणि पनवेल येथील जमीन अधिग्रहण करताना गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा