• Mon. Jul 6th, 2026

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सर्व ग्रामपंचायतींनी सक्रीय सहभाग नोंदवावा – पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Sep 17, 2025
    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सर्व ग्रामपंचायतींनी सक्रीय सहभाग नोंदवावा – पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले – महासंवाद

    • निवळी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

    लातूर, दि. १७ : राज्याच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान ग्रामविकासाला नवी दिशा देणारे ठरणार असून लातूर जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी सक्रियपणे या अभियानात आपला सहभाग नोंदवून आपल्या जिल्ह्याचा ठसा राज्यस्तरावर उमटवावा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. निवळी येथे आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनगाव येथे झालेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या राज्यस्तरीय शुभारंभाचे थेट प्रक्षेपण या कार्यक्रमात दाखविण्यात आले. आमदार रमेश कराड, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी, निवळीचे सरपंच अभय सोणपेठकर यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभिनाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या ग्रामविकासाच्या विविध योजनांची लोकसहभागातून प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आपल्या गावाचा विकास साधण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येवून एकजुटीने प्रयत्न करून या अभियानाला लोकचळवळ बनवावी. विशेषतः महिलांनी या अभियानात पुढाकार घेऊन गावाला पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. या अभियानाला जिल्हास्तरावर निवळी येथून सुरुवात झाली आहे, त्यामुळे या गावाने योग्य नियोजन करून अभियानात चमकदार कामगिरी करावी. जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभागी होवून आपल्या गावाच्या विकासाला गती द्यावी. यासाठी शासन आणि प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे पालकमंत्री श्री. भोसले यांनी सांगितले. बार्शी ते लातूर या मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. यासोबतच निवळी येथील रस्त्यांची कामेही लवकरच सुरु करण्यात येतील, असे पालकमंत्री म्हणाले.

    गावांचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघातील ग्रामपंचायतींना या अभियानासाठी आवश्यक सहकार्य केले जाईल. या अभियानात यशस्वी होण्यासाठी सर्वच ग्रामपंचायतींनी नियोजनबद्ध काम करावे, असे आवाहन आमदार रमेश कराड यांनी यावेळी केले.

    प्रास्ताविकामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे स्वरूप, निकष याबाबत माहिती दिली. निवळी ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण यावेळी पालकमंत्री  भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी केली. तसेच गावातील सुविधांची माहिती घेतली.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed