Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबाग सोडून 24 तासांपेक्षा जास्त काळ लोटला तरी लालबागच्या राजाच्या मूर्तीचं विसर्जन झालेलं नाही. यामुळे भाविकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. काही चूक झाली असल्यास बाप्पा माफ करा, अशी प्रार्थना भाविकांकडून केली जात आहे.
लालबागचा राजा आज पहाटेच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर दाखल झाला होता. गिरगाव चौपाटीवर शेवटची आरती झाल्यानंतर राजाच्या विसर्जनाची तयारी करण्यात येणार होती. लालबागच्या राजा गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी अथक परिश्रम घेतले. राजाची मूर्ती तराफ्यावर ठेवण्याचे प्रचंड प्रयत्न केले. जवळपास दोन ते अडीच तास त्यांच्याकडून प्रयत्न करण्यात आला. पण तराफ्याची उंची जास्त असल्यामुळे मूर्ती तराफ्यावर ठेवण्यास अडचणी आल्याचं बोललं जात आहे.
मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून एकीकडे प्रयत्न केले जात होते तर दुसरीकडे पाणी किनाऱ्यावर वाढत जात होतं. एक वेळ अशी आली की लालबागच्या राजाची मूर्ती ही कंबरे इतक्या पाण्यात उभी होती. विशेष म्हणजे ही अशा प्रकारची परिस्थिती कधीच उद्भवलेली नव्हती. इतक्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच असं काहीतरी घडतंय. त्यामुळे भाविक देखील प्रचंड भावूक झालेले बघायला मिळाले. काही चूक झाली असेल तर हे बाप्पा आम्हाला माफ कर, अशी प्रार्थना भाविकांकडून यावेळी केली जात होती. अत्यंत भावनिक वातावरण यावेळी गिरगाव चौपाटीवर झालेलं बघायला मिळालं. पण समुद्राचं पाणी ओसरायला तयार नव्हतं. त्यामुळे लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाने पाणी ओसरल्यावरच खोल समुद्रात आपण मूर्तीचं विसर्जन करु, असा निर्णय घेतला.
लालबागचा राजा हा प्रचंड लोकप्रिय बाप्पा आहे. फक्त मुंबईच नाही तर देशभरातून भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. मोठमोठे सेलिब्रेटी बाप्पाच्या दर्शनाला येतात. लाखो भाविक बाप्पाचं दर्शन घेतात. विशेष म्हणजे सलग 11 दिवस ज्या भाविकांना बाप्पाचं दर्शन घेता येत नाही त्यांच्यासाठी बाप्पाची भव्य मिरवणूक काढून दर्शन दिलं जातं. लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीतही लाखो भाविक असतात. अत्यंत छोट्या गल्ल्यांमधून बाप्पाची मिरवणूक नेली जाते. लाखो भाविक यावेळी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी करतात.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर बाप्पाची मिरवणूक सुरु होती. अत्यंत वाजतगाजत बाप्पाची मिरवणूक सगल 20 ते 24 तास चालते. त्यानंतर गिरगाव चौपाटीवर आल्यावर बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं. पण आज बाप्पाचं विसर्जन गेल्या 8 तासांपासून रखडलं आहे. त्यामुळे भाविक चिंतेत आहेत.
लालबागच्या राजाचा पाट वाळूत फसला आहे. तसेच मूर्तीचा पाय अजूनही पाण्यात आहे. त्यामुळे बाप्पाची मूर्ती उचलून तराफ्यात ठेवण्यास अडचणी येत आहेत. विशेष म्हणजे यावेळी सर्व गोष्टींकडे बारकाईन लक्ष ठेवण्यासाठी आणि काळजी घेण्यासाठी गिरगाव चौपाटी परिसरात हेलिकॉप्टर आणण्यात आलं आहे. परिसरात हेलिकॉप्टर हवेत फिरत आहे. लालबागच्या राजाचं विसर्जन समुद्राला आलेल्या भरतीमुळे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लांबणीवर गेलं आहे. आता पाणी बऱ्यापैकी ओसरलं आहे. पाणी ओसरल्यानंतर मूर्ती तराफ्यावर ठेवली जाईल आणि नंतर शेवटची आरती केली जाईल. या आरतीनंतर बाप्पाला खोल समुद्रात नेवून मूर्तीचं विसर्जन केलं जाईल.

