Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनावर मिलिंद देवरा यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी निशाणा साधला आहे. तसंच मुख्यमंत्री फडणवीसांनी आंदोलनादरम्यान झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
‘मराठा आरक्षण आंदोलनामुळे मुंबईकरांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिलगिरी व्यक्त केली आहे. मराठा समाजाच्या काही भावना होत्या त्यासाठी रस्त्यावर यायचे नाही तर कुठे यायचे? मराठी माणसामुळे मुंबई ठप्प झाली तर त्यात वावगे काय?,’ असा सवाल मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला. शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली त्या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना विखे यांनी हे उत्तर दिले.
Mumbai Ganesh Visarjan 2025: ‘लालबागचा राजा’ची शान परंपरेसोबत तंत्रज्ञानाने वाढणार, विसर्जन मिरवणुकीत खास यंत्रणा
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मुंबईतील मराठा आंदोलनातून तोडगा काढण्यासाठी मंत्री विखे यांची महत्त्वाची भूमिका राहिली. त्यानंतर गुरुवारी त्यांचे शिर्डीत आगमन झाले. त्या वेळी सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. आमदार विठ्ठलराव लंघे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, माजी नगराध्यक्ष अभय शेळके, संभाजी ब्रिगेडचे दशरथ गव्हाणे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
‘साईबाबांच्या भूमीतून श्रद्धा आणि सबुरीचा संदेश घेऊनच आपण आझाद मैदानातील आंदोलनाला सामोरे गेलो होतो. दडपण होते; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकारी मंत्र्याच्या पाठबळामुळे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा आत्मविश्वास मनात निश्चित होता. जरांगे यांच्या आंदोलनाची तीव्रता जशी वाढत होती तेव्हाच उपसमितीने बैठका घेऊन मागण्यांवर सकारात्मक निर्णय होण्याच्या दृष्टीने यशस्वी प्रयत्न केले. न्यायमूर्ती शिंदे समितीला विश्वासात घेऊन राज्याच्या महाधिवक्त्यांच्या मार्गदर्शनाने तयार केलेला मसुदा आंदोलकांच्या हाती ठेवला. यामधून आंदोलकांचे निश्चित समाधान होईल असा आत्मविश्वास मनामध्ये होता,’ असेही विखे म्हणाले.

