Solapur News : मंगळवेढा तालुक्यात नंदेश्वरच्या एका युवा शेतकऱ्याने जमिनीच्या नोंदीवरून त्रस्त होऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तलाठी आणि मंडल अधिकार्यांच्या नावाचा उल्लेख करत तहसील कार्यालयात डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदेश्वरमधील समाधान मोटे या शेतकऱ्याच्या खरेदीची नोंद महसूल यंत्रणांकडून रद्द करण्यात आली. ज्या कारणास्तव रद्द करण्यात आले. त्यातील दुरुस्ती शेतकऱ्याने करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या संदर्भातील नोंद घेण्यास तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्यावरून संबंधित शेतकऱ्याने गुरुवारी दुपारी मंगळवेढा तहसील कार्यालयात अंगावर ज्वलंत पदार्थ ओतून पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, महसूल मधल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही दुर्दैवी घटना टळली.
व्हाट्सएप स्टेटस ठेऊन आरोप
संतप्त झालेल्या शेतकऱ्याने आपल्या त्रासाला तलाठी व मंडल अधिकारी जबाबदार असून आपण त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा व्हाट्सअप स्टेटस ठेवले आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर यामध्ये दोषी कोण आहेत? याबाबत प्रांत अधिकारी तहसीलदार यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.अलीकडेच स्वांतत्र्यदिनी देखील अशाच दोन धक्कादायक घटना समोर आल्या होत्या. वर्धा जिल्ह्यात दोघांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या आवारात कंत्राटदार बाबा जाकीर यांनी कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे यांच्या त्रासाला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न केला. दीड कोटी रुपयांच्या देयकांची फाइल गेल्या महिनाभरापासून प्रलंबित आहे. यासाठी अभियंता टाळाटाळ करत असल्याने त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे स्थानिक उपजिल्हा निबंधक कार्यालयासमोर दोन कर्मचाऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. थकीत वेतनासाठी त्यांनी हे पाऊल उचलले.

