Ajit Pawar Viral Video : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोनवर धमकी देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हिडीओवरुन आता विरोधकांकडून टीका केली जात आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता बाबा जगताप याने तर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला. त्यानंतर त्याने डीएसपी अंजली कृष्णा यांच्याकडे फोन दिला. यावेळी अजित पवार यांनी अंजली कृष्णा यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. पण अंजली कृष्णा यांनी हीच बाब आपण आपल्या फोनवर कॉल करुन सांगा, असं सांगितलं. यानंतर अजित पवार चांगलेच संतापले. त्यांनी अंजली कृष्णा यांना कारवाई करु, अशी धमकी दिली.
एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, बेकायदा मुरुम उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदार आणि तलाठी गेले होते. यावेळी काही गुंड लाठ्या काठ्या घेऊन गेले. त्यांनी अधिकाऱ्यांना दम देत कारवाई थांबवली. विशेष म्हणजे या गुंडांनी अजित पवार यांना फोन करुन हा सगळा प्रकार सांगितला. अजित पवारांनी या गुंडांना झापण्यापेक्षा पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना दम दिला. कारवाई आताच्या आता थांबवा. नाहीतर तुमच्यावर कारवाई करु, अशी धमकी अजित पवारांनी दिली. कार्यकर्त्याच्या फोन ऐवजी माझ्या वैयक्तिक नंबरवर फोन करुन सांगा, असं अंजली कृष्णा यांनी सांगितल्यानंतर अजित पवारांना आणखी राग आला. त्यांनी नंबर घेऊन कृष्णा यांना व्हिडीओ कॉल केला. तहसीलदारांना सांगा माझा आदेश आहे, असा दम अजित पावारांनी दिला. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. या घटनेनंतर अजित पवार यांनी माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे.
दोघांमधील फोनमधील संभाषण काय?
पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा : आम्हाला त्यांचं मदत करण्याचंच काम आहे सर
अजित पवार : मी उपमुख्यमंत्री अजित पवार तुमच्यासोबत बोलत आहे. तुम्ही जा आणि तहसीलदारांना सांगा की, स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आला होता. त्यांनी मला ही सगळी कारवाई थांबवण्यास सांगितली आहे. कारण सध्या मुंबईत जरा वातावरण खराब झालं आहे. त्याला आपल्याला आधी प्राधान्य द्यायचं आहे. त्यांना माझं नाव सांगा. त्यांना सोडून द्या.
पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा : सर मला आपण हे माझ्या वैयक्तिक फोनवर फोन करुन सांगा.
अजित पवार : एक मिनिट. मी तुझ्यावर डायरेक्ट अॅक्शन घेणार. तुम्ही मला डायरेक्ट कॉल करायला सांगत आहात?
पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा : सर आपण जे बोलत आहात ते समजत आहे. पण आपण मला कॉल करा.
अजित पवार : तुला मला पाहायचं आहे ना, तुझा नंबर दे मी व्हाट्सअॅप कॉल करतो. मी इथून बोलतो. माझा चेहरा तर आपल्या लक्षात येईल ना? तुमची एवढी डेरिंग झालीय का?
पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा : सर मला माहिती नाही ना सर.
अजित पवार : मी डेप्युटी चीफ मिनिस्टर आहे.
पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा : सर तुम्ही काय बोलताय ते मला समजतंय.
अजित पवार : आपला नंबर द्या. मी डायरेक्ट कॉल करतो
पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा : सर, 944…. (अंजली आपल्या सहकाऱ्यांना व्हिडीओ काढायला सांगतात)
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा
