ओबीसींची समजूत काढण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत सरकारने मराठा आरक्षणाबाबत नवा जीआर काढला. पण यामुळे ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी नेत्यांची नाराजी दूर करण्याच्या तयारीत आहेत.
काही ठिकाणी ओबीसी संघटनांनी आंदोलन करताना मराठा आरक्षणाच्या जीआरची होळी केलेली बघायला मिळाली. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाचा जीआर फाडून टाकला. ओबीसींच्या या आक्रमक पवित्र्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कामाला लागले आहेत. ओबीसींची मनधरणी करण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. याचबाबत महत्त्वाची माहिती समोर आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: उद्या नागपुरात ओबीसी आंदोलकांची भेट घेवून साखळी उपोषण सोडवणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषण सुरु असलेल्या ठिकाणी भेट देणार आहेत. देवेंद्र फडणवीस ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. त्यासोबतच मंत्री अतुल सावे हे देखील उद्या नागपूरला जावून ओबीसी आंदोलकांची भेट घेणार आहेत.
ओबीसी आंदोलकांचं नागपुरात साखळी उपोषण सुरु आहे. त्यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. त्यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री अतुल सावे हे देखील कामाला लागले आहेत. ओबीसी आंदोलकांची मनधरणी करण्याची मोठी जबाबदारी आता मंत्री अतुल सावे यांच्याकडे सुद्धा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अतुल सावे यांना ओबीसींची मनधरणी करण्यात यश येतं का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
ओबीसींच्या मागण्या नेमकं काय?
- मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये.
- मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये.
- हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा अन्यायकारक निर्णय मागे घ्या.
- ओबीसी मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 100 टक्के शिष्यवृत्ती द्या.
- महाज्योती संस्थेकरता 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करा.
- बार्टीप्रमाणे महाज्योती संस्थेची कामे ओबीसी प्रवर्गातील संस्थेला देऊन रोजगार द्या.

