खासदार सुप्रिया सुळे मनोज जरांगे यांच्या भेटीला गेल्या असता त्यांना परतत असताना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. या घटनेवर सुप्रिया सुळे यांनी आज आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “मराठा बांधव नाही स्वतः एकच माणूस असं म्हणाला. एखाद्या आंदोलनात एखादा माणूस बोलतो. आपण समजून घेतलं पाहिजे, त्यांच्या वेदना असतात. त्यांना बोलायचा अधिकार आहे”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. “पार्लमेंटमध्ये सर्वात जास्त मराठा आरक्षणावर बोलणारी खासदार सुप्रिया सुळे आहे”, असंदेखील सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांचा फडणवीसांवर निशाणा
“मराठा आरक्षणाबाबत सरकार अतिशय असंवेदनशील आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्षनेते होते त्यावेळी त्यांनी जे वक्तव्य केलं होतं, त्याची विनम्रपणे आठवण करून दिली पाहिजे. तेव्हा ते सत्तेत नव्हते. मात्र आज ते सत्तेत आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सगळी सत्ता त्यांच्याकडे आहे. अडीचशे आमदार, तीनशे खासदार, त्यांच्याकडे आहेत”, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्यावर निशाणा साधला.
मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. या मागणीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिकेबाबत सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की, मुख्यमंत्र्यांनी आंदोलक जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली पाहिजे. जो कोणी आंदोलनाला बसला आहे त्याचा मान सन्मान एका सशक्त लोकशाहीमध्ये झाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे. चर्चेतून मार्ग निघू शकतो”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या फेसबुक पेजवर AI च्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचा मराठा आरक्षण प्रलंबित ठेवल्या बाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आमचं घर फोडलं. आमचा पक्ष फोडला. एवढं करूनही, व्हिडिओ आमचाच बनवितात. चांगलं की वाईट? याचा अर्थ आपलं नाणं चालतं ना मार्केटमध्ये” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
“भारतीय जनता पक्षाकडे आमच्याबद्दल बोलायला काहीच नाही. गल्ली टू दिल्ली सत्ता असतानाही शरद पवारांवर टीका केल्याशिवाय बातमी होत नाही, हीच तर बारामतीची खासियत आहे”, असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

