नुकत्याच झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीवेळी बारामतीतील बहुतांश अल्पसंख्याक समाजाने ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना साथ दिली होती. मात्र आता शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी त्यांची साथ सोडत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळ देण्याची भूमिका घेतली आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
अजित पवारांचं जुन्या कार्यकर्त्यांना आवा
“नवीन कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केल्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांनी वेगळा विचार करण्याची आवश्यकता नाही. कुणीही नाराज होणार नाही, याची मी दक्षता घेईन. अनेकांना विविध संस्था, महामंडळे, कमिटी आहेत. त्यामुळे त्या त्या ठिकाणी संधी मिळेल. त्यामुळे कोणीही काळजी करण्याचे कारण नाही”, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिला.
बारामतीत पवार कुटुंबात वर्चस्वाची राजकीय लढाई
लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक या दोन्ही निवडणुकांमध्ये बारामतीत पवार कुटुंबातच वर्चस्वाची लढाई बघायला मिळाली. पहिल्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आमनेसामने आल्या. सुनेत्रा पवार यांचा निसटता पराभव झाला. यानंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांनी फाईट दिली. पण या निवडणुकीत युगेंद्र पवार यांचा पराभव झाला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणत्या गटाची ताकद जास्त आहे, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
