• Sun. Mar 8th, 2026
    मोठी बातमी: मनोज जरांगेंना धक्का; आझाद मैदानात उपोषण करण्यास हायकोर्टाची मनाई; सरकारला महत्त्वाचे निर्देश

    Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा उपोषण करणार असल्याची घोषणा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मुंबई हायकोर्टाने नाकारली आहे. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोर्टाने हे निर्देश दिले असून, यामुळे मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

    मनोज जरांगेंना मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करण्यास हायकोर्टाची मनाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान येथे आंदोलन करण्यास मुंबई हायकोर्टाकडून मनाई करण्यात आली आहे. नवी मुंबईत खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याची राज्य सरकारला मुभा असेल, असे मुंबई हायकोर्टाचे एका जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान निर्देश दिले आहेत. मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांची डोकेदुखी वाढली असून ते पुढे काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    मनोज जरांगे पाटील यांनी गणेशोत्सव काळात मुंबईत उपोषणाला येणं टाळावं, अशी विनंती करण्यासाठी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र साबळे हे अंतरवाली सराटी इथं दाखल झाले होते. राजेंद्र साबळे यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत याबाबत चर्चाही केली. मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार घेणार नाही, अशी ठाम भूमिका या भेटीनंतर जरांगेंनी मांडली. आम्ही मुंबईला निघण्याआधी सरकारने आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, तरंच आम्ही माघार घेऊ, असं जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. परंतु आता हायकोर्टानेच मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केल्याने मनोज जरांगेंची कोंडी होणार आहे.

    Maharashtra TimesLaxman Hake on Manoj Jarange : ‘महाराष्ट्राच्या मानगुटीवर साडेअठ्ठावीस किलोचं भूत, पोलिसांनी जरांगेंना…’; लक्ष्मण हाकेंची घणाघाती टीका, काय म्हणाले?

    सरकारकडून काय विनंती करण्यात आली होती?

    मनोज जरांगे हे उद्या मुंबईकडे निघणार असल्याने आज मुख्यमंत्र्‍यांच्या वतीने त्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी जरांगे यांना विनंती केली. “उपोषण पुढे ढकण्याची विनंती करण्यासाठी आणि मराठा आरक्षण मोर्चाच्या जालना ते मुंबई या प्रवासाचा मार्ग जाणून घेण्यासाठी मी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली,” अशी माहिती ओएसडी राजेंद्र साबळे यांनी भेटीनंतर दिली.

    कसा असेल जरांगेंच्या मुंबई मोर्चाचा मार्ग?

    मनोज जरांगे पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेत अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे जाण्याचा मार्ग सांगितला होता. “अंतरवाली सराटी येथून 27 ऑगस्टला निघून पुढे आम्ही छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, खेड, चाकण, पुणे या मार्गे लोणावळा, वाशी आणि चेंबूरमधून मुंबईतील आझाद मैदान इथं पोहोचणार आहोत. 27 ऑगस्टला रात्री आमचा मुक्काम किल्ले शिवनेरीवर असेल. शिवनेरी किल्ल्यावर माती कपाळी लावून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 ऑगस्टला शिवनेरीहून मुंबईला निघू आणि 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी आझाद मैदानावर पोहोचू,” असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं होतं.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा