CM Devendra Fadnavis: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाची घोषणा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र साबळे यांनी जालन्यात भेट घेऊन उपोषण पुढे ढकलण्याची विनंती केली. परंतु जरांगे पाटील उपोषणावर ठाम असून मागण्या मान्य न झाल्यास उपोषण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र साबळे हे 12 वाजताच्या सुमारास मनोज जरांगेंना भेटण्यासाठी अंतरवाली सराटीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मनोज जरांगेंशी चर्चा करत गणेशोत्सव काळात मुंबईत होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आपले उपोषण पुढे ढकलावे, अशी विनंती केली. मात्र साबळे यांच्या विनंतीनंतरही जरांगे पाटील हे उपोषणावर ठाम असून आम्ही उद्या मुंबईकडे निघणार आहोत, त्याआधी तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा आमच्या निर्णयात बदल होणार नाही, अशी भूमिका मांडली आहे.
Vote Chori च्या आरोपांदरम्यान मोठा ट्विस्ट, मविआ जिंकलेल्या ठिकाणीही दुबार मतदार, मुंबईत उमेदवारांच्या तक्रारी
“उपोषण पुढे ढकण्याची विनंती करण्यासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली ते मुंबई या प्रवासाचा मार्ग जाणून घेण्यासाठी मी आज त्यांची भेट घेतली,” अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी दिली आहे. मात्र जोपर्यंत आरक्षणाची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, उपोषण पुढे ढकलणार नाही, अशी ठाम भूमिका जरांगे यांनी मांडली आहे.
“लोकांना त्रास होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. मुंबईत येण्यासाठी तुम्ही आम्हाला जो रस्ता द्याल, त्या रस्त्याने आम्ही येऊ. आझाद मैदान परिसरात कोणत्या गणपतीचे विसर्जन होत नाही. त्यामुळे आमच्या उपोषणाचा कोणत्याही मंडळाला त्रास होणार नाही. आम्ही लोकशाही मार्गाने शांततेत उपोषण करू,” असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवू, असं राजेंद्र साबळे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे याबाबत पुढील काही तासांत तोडगा काढला जातो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

