• Sat. Jun 13th, 2026
    अहिल्यानगरात दर्ग्याची विटंबना, वातावरण तापण्यापूर्वीच पोलिसांची कारवाई, आरोपींना बेड्या ठोकल्या

    Ahilyanagar Dargah Incident : अहिल्यानगर शहरातील सय्यद घोडेपीर दर्ग्यात अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी तातडीने कारवाई करत, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जेसीबी जप्त केला आहे. जेसीबी चालकाला ताब्यात घेतले असून त्याने गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अहिल्यानगर : 24 ऑगस्टला पहाटेच्या सुमारास अहिल्यानगर शहरातील पटवर्धन चौक परिसरातील सय्यद घोडेपीर दर्गा या श्रद्धास्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली होती. ज्यामुळे दोन गटांत तणाव निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली होती. यामुळे वातावरण आणखी चिघळू नये, म्हणून पोलिसांनी तातडीने कारवाई केली असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

    वसिम रौफ खान यांनी कोतवाली या तोडफोडीसंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून भारतीय न्याय संहितेच्या कलम 298, 299, 324 (4), 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी विशेष पथके तयार करण्याचे आदेश दिले आहेत. कोतवाली, तोफखाना पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा यांचे संयुक्त पथक प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

    पोलिसांच्या माहितीनुसार, तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहेत. ज्यामध्ये तोडफोडीसाठी वापरलेले जेसीबी वाहन सापडले आहे. पोलिसांनी जेसीबी मालक अरुण गोविंद खरात यांची चौकशी केली असता वाहन बबलू पाल या चालकाकडे असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बबलू पाल याला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत त्याने काही साथीदारांसह ही घटना घडवून आणल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर त्याचे साथीदार योगेश झोंड, सचिन दारकुंडे, दत्ता गायकवाड यांच्यासह आणखी तीन ते चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

    सदर दोन्ही आरोपींसह जेसीबी मालका अरुण खरातला पुढील तपासासाठी कोतवाली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. या तपासादरम्यान आणखी काही व्यक्तींची नावे समोर आली असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक मा. वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मा. शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या संयुक्त कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा, कोतवाली आणि तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

    दरम्यान, पोलिस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, ही घटना लक्षात घेऊन कोणीही अफवा पसरवू नये. समाजातील शांतता आणि सौहार्द अबाधित ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा