• Fri. Jul 3rd, 2026

    जिल्ह्यात डीजेमुक्त गणेशाेत्सव साजरा करा – पालकमंत्री संजय शिरसाट

    ByMH LIVE NEWS

    Aug 24, 2025
    जिल्ह्यात डीजेमुक्त गणेशाेत्सव साजरा करा – पालकमंत्री संजय शिरसाट

    छत्रपती संभाजीनगर, दि. २४(जिमाका): गणेशोत्सव हा यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करत आहोत. या महोत्सवाची तयारी पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने उत्तम पद्धतीने केली आहे, यामध्ये गणेश मंडळांनी देखील पुढाकार घेऊन शांतता आणि उत्साहात पारंपरिक वाद्याचा वापर करत डीजेमुक्त गणेश उत्सव साजरा करावा, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले. एमआयटी महाविद्यालयाच्या मंथन सभागृहात आज गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

    बैठकीस विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जालना मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे, राज्यसभेचे खासदार डॉ.भागवत कराड, आमदार प्रदीप जयस्वाल महानगरपालिका आयुक्त जी .श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी ,पोलीस आयुक्त प्रवीण पवार, गणेश मंडळाचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार, यांच्यासह विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

    पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, प्रशासनाने विविध समस्या सोडवून गणेशोत्सवाची तयारी केली आहे ही आनंदाची बाब असून गणेश उत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या कुटुंबातील सर्व नागरिकांना गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा, यासाठी गणेश मंडळाने डीजेमुक्त उत्सव साजरा करावा. डीजे ऐवजी पारंपरिक वाद्य, ढोलताशे व इतर वाद्याचा वापर करून उत्साहाचे वातावरण ठेवावे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने अमलीपदार्थ विक्रीस प्रतिबंध तसेच यावरील कारवाई करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले.

    छत्रपती संभाजीनगर हे विकासाच्या वाटेवर वेगाने वाटचाल करत असून यासाठी सर्व पक्ष, सर्व पदाधिकारी, नागरिक यांनी उत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्याची शांतता व प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित गणेश मंडळ पदाधिकारी व नागरिकांना केले.

    विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महापालिकेने गणेश विसर्जनाची तयारी कृत्रिम तलावाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी करावी. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याबाबतही पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

    खासदार कल्याण काळे यांनी लेझर लाईटचा वापर गणेशोत्सवादरम्यान करू नये, त्याचप्रमाणे अमली पदार्थ विक्री प्रतिबंध तसेच यामध्ये स्थानिक पोलीस प्रशासनाने वेळीच कारवाई करण्याचेही आवाहन त्यांनी केले.

    खासदार डॉ. भागवत कराड यांनी गणेश मंडळांनी अवयदान त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर यासारख्या विविध समाजोपयोगी उपक्रमाची अंमलबजावणी करून वेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याबाबतही आवाहन केले.

    जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, गणेशोत्सव हा एकतेचा उत्सव असून या उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करणारे संदेशाचे देखावे व इतर नाविन्यपूर्ण देखावे गणेश मंडळांनी करावे व राज्य शासनाच्या होणाऱ्या स्पर्धेमध्ये  सहभागी होऊन नामांकन पाठवावे. वृक्षारोपण सारख्या मोहिमेत सहभाग घेऊन प्रत्येक गणेश मंडळांनी पुढाकार घेण्याचेही यावेळी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले.

    महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या काही परवानग्या मोफत दिल्या जाणार असून, ज्या ठिकाणी परवानगी घेतली आहे त्यांनी फक्त यावेळी संबंधित गणेश मंडळाने माहिती देणे आवश्यक आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. महापालिका गणेशोत्सवादरम्यान पाणी, रुग्णवाहिका, रुग्णालयातील उपचार, शहरातील मुख्य ठिकाणी विद्युत रोषणाई विसर्जनाच्या वेळी निर्माल्याचे संकलन करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. फिरते शौचालय, वेगवेगळ्या ठिकाणी मूर्ती दान व गणेश मूर्तीचे विसर्जन यासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था महापालिकेमार्फत करण्यात आल्याचे सांगितले. गणेश उत्सव आनंददायी व्हावा, यासाठी महापालिका प्रयत्न करत असून अडचणी असल्यास नागरिकांनी महापालिकेच्या संपर्क कक्षाच्या माध्यमातून मदतही देण्याचे आश्वासन जी. श्रीकांत यांनी दिले.

    पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून डीजेमुक्त आणि लेझरचा लाईट वापर न करता गणेश उत्सव साजरा करावा. तसेच समाज माध्यमातून विविध चुकीच्या पोस्ट किंवा माहिती प्रसारित करू नये, जेणेकरून शहर आणि जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही एकोपा जपण्यासाठी काम करावे असे आवाहन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी केले.

    या समन्वय आढावा बैठकीमध्ये विविध गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या वीज वितरण करणाऱ्या तारांचे योग्य व्यवस्थापन ,तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याबरोबरच अमली पदार्थाची विक्री  व सेवन करणाऱ्यावर प्रतिबंधात्मक कारवाईबाबत ही सूचना पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनास केल्या. सर्व विभागाने योग्य ती कारवाई करून शांततेत, समन्वयाने गणेश उत्सव साजरा करण्याची ग्वाही जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed