मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा आणण्यावर ठाम आहेत. सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे आतापर्यंत बरेच प्रयत्न झाले. पण ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी आज बीडमध्ये आपली भूमिका मांडली.
“बीडचे मराठे एकत्र यायला लागले आहेत. तुम्हाला काय सांगू? तुम्ही एकत्र आल्यामुळे त्यांची अशी फाटली… मला इथे आल्यावर लक्षात आलं. आपण एकत्र आल्याने समाजाला न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या हे समजून घ्या. गडबळ, गोंधळाने आपल्या समाजाच्या लेकरांचं वाटोळं होत आहे. कोणत्या वेळेला कोणतं पाऊल उचलायचं हे मराठ्याला लवकर समजायला हवं. परिस्थितीने मराठ्यांवर संकट आणून सोडलं आहे. या संकाटात आपण पुढचा काळ लढणार आहोत”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“तुमच्या आधी माझ्या भावनेचा ह्यांनी आतापर्यंत उपयोग केला आहे. म्हणून माझ्या मराठा समाजाला माझं प्रत्येक वेळेस हात जोडून आवाहन असतं, बाबाहो, आपली ताकद लयी मोठी आहे. फक्त आपण विचारांनी चाललो नाहीत म्हणून आपल्या लेकरांचं नुकसान झालं. यापुढे आपण इतरांच्या डोक्याने चालायचं नाही. स्वत:च्या डोक्याने चालायचं आणि जात उंचावर न्यायची. बस झालं आता, ज्याने यायचं त्याने नाटक शिकवायचं, त्याने यायचं आणि आपलं ज्ञान आम्हाला पाजळून जायचं. उभ्या पिढ्यांचं वाटोळं झालं”, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.
“उन्हातान्हात आजकाल कुणी बसत नाही. मला तुमचा गर्व वाटतो. तुम्ही उन्हात पावसात कशाचा विचार करत नाहीत. मायबाप समाजानो तुमच्यासाठी मी सुद्धा कशाचा विचार करत नाही. मरायचा सुद्धा विचार करत नाही. विचार करुन पुढच्या लढाया लढायच्या आहेत. मला फोन आले आहेत. मी फोनवाल्याला सांगितलं की, एकही मराठ्याची अस्सल अवलाद माघारी जाऊ शकत नाही”, असं मनोज जरांगे म्हणाले.
जरांगेंचा सरकारला इशारा
“तुम्ही गर्व वाटावं असं काम करत आहेत. बीडचं हे नुसतं रुप बघून सरकारला रातभर झोप राहणार नाही. बेजार होणार. चलो मुंबई. 29 ऑगस्टला जमून फाईटच आहे. मला म्हणतात, तुला हाणीन. मी म्हटलं, मला? अरे तुम्ही आई-बहिणींचं रक्त साडलं आहे, माझ्या माय-बहिणी रक्ताच्या थारोळ्यात टाकल्या. यावेळी तु्म्ही पोरांना डिवचून दाखवा. काय मराठ्यांची अवलाद आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो. आपल्याला शांततेत जायचं आहे आणि शांततेत आंदोलन करायचं आहे”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं.
मनोज जरांगे यांच्या आंदोलकांना मोलाच्या सूचना
“आरक्षणासाठी ही शेवटची लढाई आहे. मुंबईला येण्याची हौस नाही. पण लेकरंबाळांसाठी यावं लागतंय. 29 ऑगस्टला मुंबईला जायचं आहे. 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आंतरवलीतून मुंबईला निघायचं. समाजाला डाग लागेल असं पाऊल उचलायचं नाही. कुणी दगडफेक आणि जाळपोळ करायची नाही”, असंदेखील आवाहन त्यांनी केलं.
“सरकार आपल्याला खूश करण्यासाठी वेगवेगळ्या घोषणा देईल आणि त्यांचेच पाठवलेले लोकं म्हणतील, फडणवीस देत नाही आणि हाणा दगडं. हे घडू शकतं. आपल्यापासून 5 फुटाच्या अंतरावरही दगडफेक होऊ शकते. पण लक्ष द्यायचं नाही. आपल्याला माहिती नाही म्हणायचं आणि सरळ मुंबईकडे चालायचं. एकाने सुद्धा हलायचं नाही”, अशी महत्त्वाची सूचना मनोज जरांगे यांनी दिली.

