OBC Laxman Hake: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, यामध्ये त्यांनी माळी समाजातील नेत्यांवर टीका केली होती. यानंतर ओबीसी आंदोलनात फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले असून आता हाके यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“मी गेल्या दोन वर्षांपासून ओबीसींसाठी लढा देत आहे. दररोज दोन हजार लोकांशी मी संवाद साधत असतो. मी स्पष्टवक्ता आहे. पोटात एक आणि ओठावर एक, असं मी करत नाही. मला असं काही करायची गरज नाही. चार लोक आहेत, ते फेक व्हिडिओ पसरून ओबीसी समाजामध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र रचत आहेत. वेळ आल्यावर आम्ही त्यांची नावे जाहीर करू,” असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.
बीडमधील होमगार्ड तरुणीच्या हत्येला धक्कादायक वळण; लव्ह ट्रँगलमधून अयोध्याचा घात, घरी बोलावलं आणि…
“छगन भुजबळ माझे आदर्श”
माळी समाजाबद्दल वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्पष्टीकरण देताना लक्ष्मण हाके म्हणाले की, “ओबीसी नेते छगन भुजबळ आणि माझ्यात सकाळी संभाषण झालं आहे. माझ्या नेत्याची माझ्या पाठीवरील थाप लढा लढण्यासाठी ऊर्जा करणारी आहे. मी माझ्या आयुष्यात महात्मा ज्योतीराव फुले, दिवंगत हरी नर्के यांना आदर्श मानत आलो. आता ओबीसी नेते छगन भुजबळ यांना आदर्श मानतो. माझं आणि छगन भुजबळ यांच काय नातं आहे, हे भुजबळ साहेबाना चांगलं माहिती आहे, तेव्हा असे फेक व्हिडिओ पसरून ओबीसी कधीही दुभंगणार नाही,” असं मत हाके यांनी व्यक्त केलं.
नवनाथ वाघमारेंकडून हल्लाबोल
लक्ष्मण हाके यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लक्ष्मण हाके यांनी माफी मागावी असं वाघमारे म्हणाले. पण मी चूक केलीच नाही तर माफी मागायचा प्रश्न उरत नाही. नवनाथ वाघमारे माझे चांगले मित्र आणि सहकारी आहेत. त्यांचा गैरसमज झाला असेल. आम्ही एकत्र येऊन ओबीसीची लढाई लढत आहोत. आमच्यात गैरसमज पसरून जर कोणी ओबीसीचं आंदोलन थांबवू पाहत असेल तर ते आम्ही सहन करणार नसल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले.

