Nanded Umri Tehsildar Suspended : नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. एका तहसीलदाराला निलंबित करण्यात आलं आहे. निरोप समारंभावेळी कार्यक्रमात शासकीय कार्यालयात खुर्चीवर बसून गाणे गायल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.
प्रशांत थोरात हे उमरी तहसील कार्यालयात तहसीलदार पदावर कार्यरत होते. ८ ऑगस्ट रोजी थोरात यांची लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे बदली झाली होती. त्यांच्या जागी मंजुषा भगत ह्या तहसीलदार म्हणून रुजू झाल्या. दरम्यान रेणापूर येथे रुजू होण्यापूर्वी उमरी तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून ८ ऑगस्ट रोजी प्रशांत थोरात यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रशांत थोरात यांनी स्वतःच्या कार्यालयात खुर्चीवर बसवून ‘तेरा जैसा यार कहा’, हे गाणं गायलं. हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आला.
Jyoti Chandekar: अलविदा पूर्णा आजी… ज्योती चांदेकर अनंतात विलीन; तेजस्विनी पंडितने पार पाडलं लेकीचं कर्तव्य
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. प्रशांत थोरात यांच्या कृतीमुळे शासनाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी असा अहवाल नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. त्यावरून विभागीय आयुक्तांनी तहसीलदार प्रशांत थोरात यांच्या निलंबनाचे आदेश काढले. प्रशांत थोरात हे रेणापूरचे तहसीलदारपदी होते. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर वाबनकुळे काय म्हणाले?
‘नांदेड जिल्ह्यातील उमरी येथून रेणापूर, जि. लातूर येथे बदली झालेले तहसीलदार प्रशांत थोरात यांनी उमरी येथील निरोप समारंभादरम्यान तहसीलदारांच्या अधिकृत खुर्चीत बसून गाणे सादर केले. सदर कार्यक्रमाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होऊन मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये थोरात विविध अंगविक्षेप व हातवारे करताना दिसत असून, त्यांचे वर्तन हे एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्यास अजिबात शोभणारे नाही’.
Ahilyanagar News: माझ्या दीदी-भैय्याला सांभाळून घ्या, इतकं लिहून ग्रामसेवकाने जीव दिला, अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल, प्रकरण काय?
या प्रकारामुळे शासन व प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली असून, ही बाब अत्यंत गंभीर आहे. जिल्हाधिकारी, नांदेड यांनी यासंदर्भात सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने प्रशांत थोरात यांना तत्काळ निलंबित करण्यात येत आहे. प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने आपण त्या खुर्चीत असताना पदाची गरिमा, वेळ, स्थळ आणि संदर्भ याचे भान ठेवणे आवश्यक आहे. शासकीय पदावर कार्यरत असताना त्या पदाच्या जबाबदाऱ्या, मर्यादा व प्रतिष्ठा जपणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची प्राथमिक जबाबदारी आहे. कौटुंबिक किंवा खासगी समारंभात अशा सादरीकरणास मुभा असली तरी शासकीय व्यासपीठावर वर्तवणुकीची मर्यादा पाळणे अपेक्षित आहे. सर्वच शासकीय अधिकाऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा आणि आपल्या वर्तनातून पदाची मर्यादा व प्रतिष्ठा जपावी, ही अपेक्षा आहे’, असं महसूल मंत्री चंद्रशेखर वाबनकुळे यांनी म्हटलं आहे.

