Govinda Death in Mankhhurda : मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह असताना या उत्सवाला गालबोट लावणारी घटना मानखुर्दमधून समोर आली आहे. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये एका गोविंदाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये ही दुर्घटना घडली आहे. बाल गोविंदा पथक तिथे दाखल झालं होतं. 32 वर्षीय जगमोहन चौधरी याला दहीहंडीचा रोप बांधला जात होता. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. जगमोहन चौधरी दोर बांधत असताना खाली पडला आणि या दुर्दैवी घटनेत त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जगमोहनला तातडीने शताब्धी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण तिथे डॉक्टरांनी त्याला तपासलं असता त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं. यामुळे मानखुर्दमध्ये शोककळा पसरली आहे.
मुंबईत दुपारी 3 वाजेपर्यंत 30 गोविंदा जखमी
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, दुपारी 3 वाजेपर्यंत 30 गोविंदा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मुंबईतील विविध रुग्णालांमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यापैकी 15 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 15 जणांवर सध्या मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.
ठाण्यात सातव्या थरावरुन पडून गोविंदा जखमी
ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमातही दुर्दैवी घटना घडली आहे. इथे 8 थरांची सलामी देण्यासाठी एक गोविंदा पथक सर करत होतं. पण अचानक दुर्दैवी घटना घडली आणि सातव्या थरावरील गोविंदा खाली पडला. या घटनेत संबंधित गोविंदा हा जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, सर्व गोविंदा पथकातील गोविंदाना आपल्या जीवाची काळजी घेण्याचं आवाहन सरकारकडून नेहमी केलं जात आहे. दहीहंडी हा आनंदाचा उत्साह आहे. त्यामुळे अतिशय सावधपणे थर रचून दहीहंडी फोडण्याचं आवाहन केलं जात आहे. दरवर्षी गोविंदा जखमी होण्याच्या घटना घडतात. सरकारकडून जखमी गोविंदासाठी विम्याची देखील योजना गेल्यावर्षी सुरु करण्यात आली होती. जखमी गोविंदाचा खर्च सरकारकडून केला जातो. आज जखमी झालेल्या गोविंदा लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना सर्वसामान्यांकडून केली जात आहे.

