Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात आज सायंकाळच्या सुमारास वीज पडून एका शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. घारोड शिवारात शेतातून घरी परतत असताना ही घटना घडली. या दुर्घटनेत दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात साधारणत: दुपारी एक वाजेच्या दरम्यान बहुतांश तालक्यांमध्ये अचानक वातावरणात बदल झाला. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यातच घाटाखाली असलेल्या खामगाव तालुक्यात एका शेतकरी मजूर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर २ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. तिला पुढील उपचारासाठी खामगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे.
खामगाव तालुक्यातील घारोड शिवारात आज संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास कोकिळाबाई प्रकाश परकाळे (वय ५० राहणार घारोड) या शेतमजुरी करून शेतातून घरी येत होत्या. यावेळी त्याच्यासोबत कांताबाई दिगांबर परकाळे (वय वर्षे ५५) व दुर्गा भगवान खोमणे (वय ३४ रा.घारोड) या सुद्धा होत्या. मात्र यावेळी अचानक वीज पडून कोकिळाबाई प्रकाश परकाळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सोबत असणाऱ्या सौ दुर्गा खोमणे, कांताबाई परकाळे या गंभीर जखमी झाल्या असून दोघींना खामगावच्या सामान्य रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात व परिसरात पावसाने उघडीप दिली होती. यानंतर मात्र आज अचानक पावसाने घातलेला हा धुमाकूळ आणि त्यातच एक मृत्यू झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्सव सुरू असताना दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

