Himani Shivpuri : प्रसिद्ध अभिनेत्री हिमानी शिवपुरी या आज डोंबिवलीत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्या. पण त्यांना मुंबई ते डोंबिवली प्रवास करत असताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. वाहतूक कोंडीमुळे त्या एक तास उशिराने कार्यक्रमस्थळी पोहोचल्या. यामुळे त्यांनी आपल्या भाषणात संताप व्यक्त केला.
डोंबिवली तील वेध अकेडमीच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी हिमानी शिवपुरी मुंबई ते डोंबिवली या प्रवासात अनेक तास वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. तर रस्त्यात अनेक ठिकाणी त्यांना खड्ड्याचा त्रास सहन करावा लागला. यामुळे त्यांच्या संतापात भर पडली. कार्यक्रमाच्या वेळेपेक्षा त्यांना पोहोचण्यास एक तास उशीर झाल्याने त्यांनी प्रशासनावर चांगलेच खापर फोडले. गाडीतून उतरताच त्यांनी उपस्थिताची माफी मागताना शासनाला मात्र धारेवर धरले.
प्रशासन रस्ते कसे बनवतात तेच कळत नाही. पहिल्या पावसातच रस्ते उखडतात आणि करदात्या नागरिकांना नाहक खड्ड्याचा त्रास सहन करावा लागत असल्यचे सांगताना त्यांनी शहरातील रस्त्यावरून प्रवास करताना असे वाटते की जर रिक्षाने प्रवास करायचा म्हटला तर खड्ड्यात रिक्षा आदळून प्रवाशाच्या शरीराचा ढाचाच बदलून जाईल, अशी भीती त्यांनी मांडली.
मुंबई ही देशाची राजधानी आहे. मात्र देशातील इतर शहरे इतकी सुंदर असताना मुंबई आणि त्यांच्या आजूबाजूची उपनगरे इतकी घाणेरडी का? महापालिकेकडे पुरेसा निधी आहे. मात्र त्यांची शहरे सुधारण्याची मानसिकता का नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. मुंबई सारखे शहर येणाऱ्या प्रत्येकाचे ज्या आनंदाने स्वागत करते तितके ते शहर सुंदर का ठेवले जात नाहीय, अशी आपली खंत असल्याचे त्या पुढे म्हणाल्या.
दरम्यान, मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. पण काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने आज पुन्हा एन्ट्री मारली आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरात पडलेल्या पावसाने काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. डोंबिवलीत शीळ रोडवरील वाहतूक कोंडी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरुन राजकारण तापताना दिसत आहे. या मार्गावर मेट्रोचं काम सुरु आहे. यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

