विधानसभा निवडणुकीआधी महायुतीने शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. पण महायुतीचं सरकार येऊन आता सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरीही कर्जमाफी झालेली नाही. त्यामुळे विरोधकांकडून सातत्याने सरकारवर टीका केली जात आहे. या दरम्यान आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान समोर आलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीची चर्चा आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जात आहे. कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांकडून सरकारला सातत्याने घेरलं जात आहे. माजी आमदार बच्चू कडू यांच्याकडून विविध शहरांमध्ये मोर्चा काढला जातोय. राज्य विधीमंडळाचं नुकतंच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. कर्जमाफी कधी करणार? असा जाब विरोधकांनी सरकारला विचारला होता. त्याला उत्तर देताना सरकारने कर्जमाफी करावी का आणि ती कशी करावी? याबाबतचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली असल्याची माहिती सरकारने दिली होती. ही समिती कर्जमाफीबाबत सरकारला अहवाल देईल, त्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं सरकारने म्हटलं होतं. यानंतर आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत.
सरसकट कर्जमाफी होणार नाही. फक्त गरजूंसाठी होईल, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. तसेच फार्म हाऊस आणि बंगले बांधणाऱ्यांना कर्जमाफी कशाला? असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यानुसार, राज्यात गरीब शेतकऱ्यांसाठी सरकार कर्जमाफी करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी निकष नेमके काय असतील? ते मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात घोषणा केली की, महाराष्ट्रातल्या अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ज्यांना खरी कर्जमाफीची गरज आहे. म्हणून ती कर्जमाफी कशी असावी? एखादा व्यक्ती शेतात बंगला बांधतो, फार्म हाऊस बांधतो, तो कर्ज उचलतो. त्याला कशाला शेतकऱ्यांची कर्जमाफी पाहिजे?”, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
“ज्या गरीब माणसाच्या शेतात काहीच पिकत नाही. ज्याने कर्ज उचललं आहे, जो आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलायला निघाला आहे, अशा व्यक्तीगत सर्वेक्षण करुन कर्जमाफी केली पाहिजे याकरता आपण पुढे काम करण्याचा प्रयत्न करतोय”, अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा