• Sat. Sep 5th, 2026

नागरिकांना ‘सुरक्षित अन्न पदार्थ’ मिळण्यासाठी समन्वयाने काम करावे – मंत्री नरहरी झिरवाळ – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 11, 2025
नागरिकांना ‘सुरक्षित अन्न पदार्थ’ मिळण्यासाठी समन्वयाने काम करावे – मंत्री नरहरी झिरवाळ – महासंवाद

सण महाराष्ट्राचा- संकल्प अन्न सुरक्षेचा‘ मोहिमेचे उद्घाटन

नाशिक, दि. 11 : दैनंदिन जीवनामध्ये भेसळमुक्त अन्न पदार्थ सेवन करणे निरोगी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. नागरिकांना सुरक्षित अन्न पदार्थ मिळण्यासाठी समन्वयाने कामकाज करण्याच्या सूचना अन्न व औषध  प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज दिल्या.

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने आयोजित ‘सण महाराष्ट्राचा- संकल्प अन्न सुरक्षेचा’ या राज्यव्यापी मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री श्री. झिरवाळ बोलत होते. यावेळी अन्न, औषध प्रशासन विभागाचे विशेष कार्य अधिकारी हिरामण झिरवाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार, सहायक आयुक्त (औषध) सुरेश देशमुख, महेश देशपांडे, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी राहुल बयाणी उपस्थित होते.

मंत्री श्री. झिरवाळ म्हणाले की, राज्यात ऑगस्ट महिन्यापासून दिवाळीपर्यंत विविध सण- उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होणार आहेत.  या कालावधीत नागरिक मिठाई, खवा व इतर अन्न पदार्थ खरेदी करतात. त्यावेळी काही आस्थापनाकडून भेसळयुक्त, कमी दर्जाच्या पदार्थांची विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे 11 ते 18 ऑगस्ट या कालावधीत मिठाई, खवा, फरसाण, चिवडा आदी पदार्थांची तपासणी करण्यात यावी. विविध आस्थापनामध्ये वापरलेले तेल, दूध, तूप आदी पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात यावेत. तपासणीत त्रुटी आढळून येणाऱ्या आस्थापनांच्या विरोधात नियमानुसार कार्यवाही करावी.

तसेच सणासुदीच्या काळात आरटीओ हद्दीतील टोलनाक्यावर परराज्यातून येणारे दूध व दुग्धजन्य  पदार्थांची तपासणी करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. झिरवाळ यांनी दिल्या. या मोहिमेनिमित्त मंत्री श्री. झिरवाळ यांनी सातपूर परिसरातील मिठाई दुकानास भेट देऊन तेथे पाहणी केली. नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित अन्न पदार्थ मिळण्याबाबत संबंधित आस्थापनेला त्यांनी  सूचना दिल्या. सहाय्यक आयुक्त (अन्न) मनीष सानप यांनी प्रास्ताविक केले, अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विनोद धवड यांनी आभार मानले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed