• Sun. Jun 14th, 2026
    Sharad Pawar : ‘दलालांची गोष्ट म्हणजे केवळ स्टोरी, पुरावे असतील तर आयोगाकडे जा’; फडणवीसांचा शरद पवारांना टोला

    Devendra Fadnavis on Sharad Pawar : ‘दलालांची गोष्ट म्हणजे केवळ स्टोरी, पुरावे असतील तर आयोगाकडे जा,’ असं म्हणज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. ते नागपुरात बोलत होते.

    देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ( शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन दलाल त्यांच्याकडे विजयाची हमी देणारा प्रस्ताव घेऊन आल्याचा दावा केल्यानंतर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. शरद पवारांच्या विधानाला फडणवीस यांनी ‘स्टोरी’ असं संबोधलं आणि निवडणुकीवर प्रभाव टाकणाऱ्या अशा कथांना जनतेची फसवणूक ठरवले.

    फडणवीस म्हणाले, ‘अशा प्रकारचे लोक मोठ्या नेत्यांकडे जातात, निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचे आयडिया देतात. पण हे नेते पोलिसांकडे तक्रार करत नाहीत, ना निवडणूक आयोगाकडे तक्रार करतात. जर खरोखरच असा प्रकार झाला असेल, तर त्वरित तक्रार का केली नाही? याचा सरळ अर्थ असा होतो की, त्यांनी त्या ऑफरचा वापर करण्याचा विचार केला का?’ ते पुढे म्हणाले की, ‘निवडणूक आयोगाने अनेक वेळा खुले आव्हान दिलं आहे की, कोणी EVM हॅक करून दाखवावे. कोणीही ते करू शकलेले नाही. तुमच्याकडे कोणी असेल तर त्याला घेऊन जा आणि दाखवा. खोटी वक्तव्ये करून जनतेने दिलेल्या विजयाचा अपमान करणे थांबवा,’ असा फडणवीसांचा पवारांना सल्ला होता.

    ‘कल्याण डोंबिवलीत मांस विक्री बंद, यांच्या बापाचे राज्य आहे का?’; जितेंद्र आव्हाड प्रचंड संतापले
    शरद पवार काल नागपुरात म्हणाले होते की, ‘विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर दोन दलाल त्यांच्या भेटीस आले होते. महाराष्ट्रातील २८८ पैकी १६० जागा जिंकण्याची हमी देत त्यांनी ऑफर दिली होती,’ असा पवारांचा दावा होता.

    ओबीसी प्रश्नावरही फडणवीसांनी पवारांवर टीका केली. ते म्हणाले की, ‘निवडणुकीत धक्का बसल्यानंतर आता ओबीसीची आठवण येत आहे. ओबीसी समाजाला नेहमीच बाजूला करण्याचं काम त्यांनी केलं. जेव्हा ओबीसी आरक्षणावर संकट आलं, तेव्हा त्यांनी दुटप्पी भूमिका घेतली. हे समाजाने पाहिलं आहे. आता जमीन सरकू लागल्यावर ओबीसीचा आधार घ्यायचा प्रयत्न सुरू आहे.’

    Nagpur-Pune Vande Bharat : नागपूर–पुणे वंदे भारतचे PM मोदींच्या हस्ते लोकार्पण, विदर्भ-पश्चिम महाराष्ट्राचा प्रवास सुस्साट; जाणून घ्या कशी असेल प्रवासी सोय

    एकीकडे पवारांनी ‘दलाल’ प्रकरण पुढे आणत सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष हल्ला चढवला, तर दुसरीकडे फडणवीसांनी त्यावर थेट पलटवार करून पवारांच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या विविध आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. ओबीसी आरक्षण, ईव्हीएमवरील आरोप, तसेच निवडणुकीवर प्रभाव टाकण्याच्या कथित प्रयत्नांमुळे राजकीय चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत.

    महाराष्ट्र डेस्क

    लेखकाबद्दलमहाराष्ट्र डेस्कमटा महाराष्ट्र डेस्क एक अनुभवी आणि जागरूक टीम आहे. ही टीम राज्य, जिल्हा, शहर आणि गाव पातळीच्या बातम्यांसह राज्यातील सामाजिक, राजकीय, प्रशासकीय आणि स्थानिक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवते. स्थानिक पातळीवर जनतेच्या समस्या, विकास योजनांचा आढावा, स्थानिक राजकारणातील बदल आणि सांस्कृतिक घडामोडींचे तटस्थ व विश्वासार्ह वार्तांकन करणे हेच या डेस्कचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक बातमीला संदर्भासह सादर करून वाचकांपर्यंत योग्य माहिती पोहोचविणे हा या टीमचा नेहमीच प्रयत्न असतो.… आणखी वाचा