• Mon. Sep 14th, 2026

वरळीच्या कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेच्या सणात राजकीय गदारोळ, एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे समोरसमोर अन्…

वरळीच्या कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेच्या सणात राजकीय गदारोळ, एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे समोरसमोर अन्…

Eknath Shinde And Aaditya Thackeray : एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आज वरळी कोळीवाड्यात समोरासमोर आलेले बघायला मिळाले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला. पण सुदैवाने पोलिसांच्या मध्यस्थीने मोठा राडा टळला. या घटनेची आता चांगलीच चर्चा होत आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : नारळी पोर्णिमा हा कोळी बांधवांचा महत्त्वाचा सण मानला जातो. या सणाच्या निमित्ताने मुंबईत वरळीच्या कोळीवाड्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. सर्व कोळीबांधव यावेळी समुद्राला नारळ अर्पण करतात. पूजा करतात. नारळी पौर्णिमेच्या सणानिमित्त वरळी कोळीवाड्यात आज नेहमीप्रमाणे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. पण या कार्यक्रमात राजकीय घडामोडी बघायला मिळाल्या. या घडामोडींमुळे काही काळासाठी कोळीवाड्यातील वातावरण तापलं होतं. पण पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मोठं काही घडलं नाही. नारळी पौर्णिमा निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरळी कोळीवाड्यात दाखल झाले. नेमकं याच वेळी आमदार आदित्य ठाकरे देखील इथे दाखल झाले. त्यामुळे तिथलं वातावरण काही क्षणांसाठी तापलेलं बघायला मिळालं.

आदित्य ठाकरे यांचा वरळी हा मतदारसंघ आहे. सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे या मतदारसंघातून निवडून आले. पण अतिशय अटीतटीच्या लढतीत त्यांचा विजय झाला. त्याआधी ते वरळीतून बिनविरोध निवडून आले होते. पण शिवसेना फुटीनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शिंदे गटाचा प्रतिकार करावा लागला.

शिंदे-आदित्य ठाकरे एकाचवेळी कोळीवाड्यात

आदित्य ठाकरे यांना बॅकफूटला टाकण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्वोतोपरी प्रयत्न केला जातो. ते आजदेखील बघायला मिळालं. आदित्य ठाकरे दरवर्षी वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेला जातात. तिथल्या कोळीबांधवांसोबत नृत्य देखील करतात. समुद्राला नारळ अर्पण करतात. पण यावेळी आदित्य ठाकरे कोळीवाड्यात पोहोचण्याआधीच एकनाथ शिंदे तिथे दाखल झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. नेतेमंडळी आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एकनाथ शिंदे स्वत: वरळी कोळीवाड्यात दाखल झाले असावेत. पण त्यानंतर लगेच आदित्य ठाकरे हे सुद्धा दाखल झाले.

दोन्ही गटाची घोषणाबाजी अन्…

आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाचवेळी वरळी कोळीवाड्यात असल्याने दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होण्याची भीती होती. यावेळी गर्दी देखील मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. एकनाथ शिंदे वरळी कोळीवाड्याला भेट देवून परतत होते तर आदित्य ठाकरे आतमध्ये शिरत होते. यावेळी दोन्ही नेते आमनेसामने आले. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला. पण पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यामुळे मोठा वाद टळला. या घटनेची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा