Uddhav Thackeray : मुंबईत विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ आज पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याची ऑफर दिली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अंबादास दानवे यांचं कौतुक केलं. तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला टोला देखील लगावला.
“अंबादास दानवे या सभागृहातील आपली पहिली कारकीर्द पूर्ण करत आहेत. अंबादास तुम्ही जोरात मी पुन्हा येईन बोला. कारण त्याला एक महत्त्व आहे. आणि आहे त्याच पक्षातून पुन्हा येईन असं म्हणा. मला अंबादास दानवे यांचं फार कौतुक वाटतं. काही जण असे आहेत की ते आज कौतुक जरी करत असले तरी जेव्हा मी अंबादास यांना उमेदवारी दिली तेव्हा त्यांचे चेहरे वेगळे होते”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
ठाकरेंनी फडणवीसांचे मानले आभार
“आता मुख्यमंत्री इथे नाहीत. मी अत्यंत मोकळेपणाने मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे धन्यवाद देतो. प्रांजळपणाने कबूल करतो की, तु्म्ही तुमच्या भाजपच्या, संघाच्या मुशीत तयार झालेला कार्यकर्ता मला दिलात किंवा मी घेतला म्हणून मी त्यांना धन्यवाद देतोय. हे धन्यवाद जसे मी त्यांना देतोय तसे ते मला धन्यवाद देणार की नाही कारण माझ्याकडून त्यांनी जे घेतले आहेत, त्यांना आज सकाळी अंबादास यांनी जे आंदोलन केलं ती भेटवस्तू द्यायची आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘भरलेल्या ताटाशी प्रतारणा केली नाही’
“पदं येतात आणि पदं जातात. पण शेवटी जनतेच्या मनात आपली प्रतिमा काय म्हणून राहते हे आपल्या आयुष्याचं फलित असतं. अनेकजण धडपडत असतात की, मला पद मिळालं पाहिजे, माझं पद टिकलं पाहिजे. अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत. पण भरलेल्या ताटाशी प्रतारणा देखील केली नाही. ताट वाढून दिली त्या पक्षाशी प्रतारणा केली नाही. नाहीतर त्या ताटात आहे ते माझंच आहे आणि आणखी मिळावं म्हणून आणखी दुसरं रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही. त्याबद्दल जनता तुम्हाला धन्यवाद देते”, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.
“हा माणूस एक कल्पक आहे. काही ना काहीतरी अभिनव पद्धतीने करत असतात. मला आज शिवसेनाप्रमुखांची आठवण येते. त्यांनी मला सांगितलं होतं की, उद्धव मुख्यमंत्री पद हे महत्त्वाचं असतं. पण तेवढ्याच ताकदीचं आणि काकणभर जास्त जबाबदारीचं विरोधी पक्षनेता पद असतं. विरोधी पक्षनेता हा आक्रमक असला पाहिजे पण आक्रस्ताळ असता कामा नये. आपल्याकडे त्याची सीमा पुसली जाते. या सभागृहात खूप विचारवंत व्यक्तींनी विरोधी पक्षनेते पद भूषवलं आहे. त्या परंपरेत अंबादास तुमचं नाव देखील घेतलं जातं”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांचं कौतुक केलं.

