Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर आज अक्कलकोटमध्ये शाईफेक केल्याची घटना घडली. शाईफेक करणारे केवळ शाईफेक करुन थांबले नाहीत. त्यांनी प्रवीण गायकवाड यांना गाडीतून बाहेर खेचत धक्काबुक्की सुद्धा केली. या घटनेचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. या घटनेमुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाकडून आज अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा नागरी सत्काराचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी प्रवीण गायकवाड अक्कलकोटमध्ये दाखल झाले होते. वाजतगाजत मिरवणूक काढून प्रवीण गायकवाड कार्यक्रमस्थळी जात होते. याच दरम्यान शिवधर्म फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांना घेरत त्यांना काळं फासलं. यावेळी प्रवीण गायकवाड यांनी शांतपणे परिस्थितीला सामोरं जाणं पसंत केलं. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. पण गोष्ट इथपर्यंत मर्यादीत राहिली नाही. यानंतरही घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. शाईफेक करणारे प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर धावून गेले.
प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर ते गाडीत बसून जात होते. पण यावेळी आंदोलकांनी त्यांची गाडी रोखत मोठा राडा घातला. त्यांनी प्रवीण गायकवाड यांना अक्षरश: गाडीतून बाहेर खेचलं. यावेळी आंदोलकांनी प्रचंड गोंधळ घातला. प्रवीण गायकवाड यांना गाडीतून बाहेर खेचल्यानंतर त्यांना धक्काबुक्की केली. संघटनेचं नाव बदलणार ना? असा सवाल केला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रवीण गायकवाड यांना मागे नेलं. त्यामुळे प्रवीण गायकवाड या गदारोळातून सुखरुप बचावले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं, नेमकं काय घडलं?
रोहित पवार यांच्याकडून घटनेचा निषेध
दरम्यान, या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “बहुजन समाजात अनेक उद्योगपती घडवणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाईफेक करणाऱ्या विकृतीचा जाहीर निषेध. शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार समाजात रुजवण्याचं खूप मोठं कार्य प्रवीणदादा गायकवाड यांच्या हातून होत आहे. अभ्यासाच्या बळावर त्यांनी अनेकांना उघडं पाडण्याचं काम केलं म्हणून तर समाजकंटकांनी त्यांच्याशी अशा प्रकारे गैरकृत्य केलं नाही ना? याचाही तपास झाला पाहिजे. तसंच हे कृत्य करणारी व्यक्ती कोणत्या पक्षाशी आणि विचारांशी संबंधित आहे हे उघड आहे. त्यामुळं या भ्याड कृत्यामागील मास्टरमाईंडचाही पोलिसांनी शोध घ्यावा. आम्ही सर्वजण प्रविणदादा गायकवाड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहोत”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

