Beed News: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. डॉक्टरांनी एका नवजात बाळाला मृत घोषित केले, परंतु अंत्यसंस्काराच्या वेळी ते रडू लागल्याने खळबळ उडाली. केज तालुक्यातील महिलेने बाळाला जन्म दिला होता. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला असून, रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील एका महिलेला प्रसूतीसाठी एसआरटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी रात्री तिने बाळाला जन्म दिला. बाळ कमजोर असल्याने डॉक्टरांनी तपासणी केली. तपासणीनंतर बाळ मृत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्यांनी बाळावर गावी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.
आयुष्य संपवण्यासाठी कुटुंबाचं टोकाचं पाऊल; चिठ्ठी लिहून चौघांकडून विष प्राशन, पण…
कुटुंब गावी पोहोचले. अंत्यसंस्काराची तयारी करत असताना, बाळ रडू लागल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तातडीने बाळाला परत एसआरटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी बाळावर उपचार सुरू केले आहेत. या घटनेमुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. या सर्व प्रकाराला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे. “या प्रकरणात अद्याप अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही,” असे सांगण्यात आले. रुग्णालय प्रशासन अंतर्गत चौकशी करणार आहे. एका निष्काळजीपणामुळे बाळ आणि त्याच्या कुटुंबाच्या जीवाशी खेळ झाला, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. संबंधित डॉक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शासकीय रुग्णालयांतील रुग्णसेवेबद्दल अनेक तक्रारी येतात. या घटनेमुळे निष्काळजीपणा किती धोकादायक ठरू शकतो, हे समोर आले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान, हे बाळ २७ आठवड्यातच जन्माला आले होते. तपासणीत प्रतिसाद न मिळाल्याने बाळाला नातेवाईकांकडे सोपवण्यात आले. त्यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

