ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चेनंतर, उद्धव ठाकरेंनी युतीचे संकेत दिले, पण राज ठाकरेंनी युतीबद्दल स्पष्ट बोलणं टाळलं. युतीबाबत बोलण्यापूर्वी विचारण्याचे आदेश राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत, ज्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला ४८ तास उलटले आहेत. मात्र अद्यापही त्यांच्या एकत्र येण्याची चर्चा जोरात आहे. असं असताना मनसे प्रमुख राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. युतीसंदर्भात कोणीही बोलू नये. बोलण्याआधी मला विचारावं, असे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत. युतीसंदर्भात कोणीही बोलू नये. कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी युती संदर्भात बोलाताना आधी मला विचारावं, असं फर्मान राज ठाकरेंनी काढलं आहे. त्यामुळे मनसे सोबतच शिवसेना उबाठाच्या पदाधिकारी आणि नेत्यांच्या मनातही संभ्रम निर्माण झालेला आहे.
शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे वरळीतील कार्यक्रमात भाषण करताना सत्ताधाऱ्यांवर अक्षरश: तुटून पडले. त्यांनी फडणवीस यांचा उल्लेख थेट अनाजीपंत असा केला. आम्हा दोघांमधला (ठाकरे बंधू) अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. पण राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर फार टीका करणं टाळलं. बाळासाहेबांना जे जमलं नाही, ते फडणवीसांना जमलं. त्यांनी आम्हाला एकत्र आणलं, अशा खोचक टोला राज यांनी फडणवीस यांना लगावला. राज यांचं उर्वरित भाषण मराठी भाषा, मराठी अस्मिता याच मुद्द्यांवर होतं.
जय गुजरात म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंनी जोरदार समाचार घेतला. काल एक गद्दार जय गुजरात म्हणाला, अशा शब्दांत उद्धव ठाकरे शिंदे यांच्यावर तुटून पडले. पण राज यांनी शिंदे यांना लक्ष्य करणं टाळलं. त्यामुळे राज यांच्या मनात नेमकं काय चाललंय, असा प्रश्न अनेकांना पडला. आम्ही तुम्हाला फेकून देऊ, सोबत महाराष्ट्र काबीज करु, अशी युतीच्या जवळपास जाणारी भाषा उद्धव करत असताना राज यांनी मात्र युतीवर काहीही बोलणं टाळलं.

