• Tue. Jun 9th, 2026
    ‘एक नवी सुरुवात करतोय…’, देवेंद्र फडणवीस यांची पंढरपुरातून मोठी घोषणा

    CM Devendra Fadnavis Podcast : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला ‘महाराष्ट्रधर्म’ या नवीन पॉडकास्ट मालिकेची घोषणा केली आहे. या मालिकेत महाराष्ट्राची संस्कृती, वारी आणि इतिहास यावर ते भाष्य करणार आहेत. ही पॉडकास्ट मालिका 6 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    सोलापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आषाढी वारीच्या निमित्ताने आज सकाळपासून पंढरपुरात आहेत. देवेंद्र फडणवीस आज पंढरपुरात वारीत रमले. त्यांनी पत्नीसह टाळ-मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जप केला. तसेच पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत फुगडी देखील खेळली. वैष्णवांच्या मेळाव्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील रमले. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात परंपरेनुसार आज पहाटे पूजा होईल. तसेच लाखो भाविक चंद्रभागेच्या तिरावर जमले आहेत. पंढरपुरात वैष्णवांचा मोठा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात स्वत: महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे पहाटेच्या पूजेनंतर देवेंद्र फडणवीस उद्या सकाळी 11 वाजता आणखी एक नवी सुरुवात करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे.

    देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ अकाउंटवरुन महत्त्वाची माहिती दिली आहे. आपण आषाढी वारीच्या शुभ मुहूर्तावर नवी सुरुवात करत असल्याचं फडणीसांनी सांगितलं आहे. “एक नवी सुरुवात करतोय. ‘महाराष्ट्रधर्म’ ही नवी पॉडकास्ट मालिका… आणि नवे काही सुरू करण्यासाठी आषाढी एकादशीपेक्षा दुसरा कोणता पवित्र दिवस असेल? पाहायला विसरू नका उद्या, रविवारी 6 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता माझ्या सर्व समाजमाध्यमांवर”, असं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावेळी त्यांनी नव्या पॉडकास्टचा ट्रेलर देखील शेअर केला आहे. या ट्रेलरमध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या संस्कृती, वारी आणि इतिहासाविषयी बोलताना दिसत आहेत.

    “छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही सत्तेकरता लढाई केली नाही. ते ध्येयाकरता लढले. देव, देश आणि धर्माकरता लढले. ही वारी कोणता इव्हेंट नाही. ही चालतीबोलती संस्कृती आहे. एक अखंड स्मृती आहे, जी महाराष्ट्राचं आत्मभिमान जपते. हजारो वर्षांपूर्वी परकीय आक्रमणाला न जुमानता झिजिया कराचा जाच न बाळगता पावले विठुरायाकडे जात होते. वारी ना इस्लामी राजवटीत थांबली, ना इंग्रजी आक्रमणात”, असं देवेंद्र फडणवीस ट्विट केलेल्या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा